लोणावळा – शनिवार आणि रविवारसह स्वातंत्र्यदिन व पतेती अशा जोडून सुट्ट्या आल्याने पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी घराबाहेर पडले आहेत. लोणावळा, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागला असून एक्प्रेस वेवर अधूनमधून वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शनिवारी देखील अशाच प्रकारे झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागले.
या शनिवारपासून पुढील आठवड्यातील रविवारपर्यंतच्या एकूण 9 दिवसात 6 सुट्टया आहेत. त्यामुळे अनेकजण आपल्या कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणी सोबत मौजमस्ती करीत आनंदी वेळ घालवण्यासाठी बाहेर पडत आहे. यातही पुणे, मुंबई यासारख्या महानगरांच्या जवळपास असणारे लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर आणि पाचगणी यासारख्या पर्यटन स्थळांकडे पर्यटकांच्या जास्त ओढा असतो.
या तीनही ठिकाणी जाण्यासाठी खासकरून मुंबई, नवी मुंबई कडील पर्यटकांना एक्स्प्रेस वेने प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहनांची संख्या अचानक वाढली असून याचा परिणाम येथील वाहतुकीवर होऊ लागला आहे.
शनिवारी खंडाळा, बोर घाटाच्या खाली तसेच घाटात काही ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मात्र महामार्ग पोलीस तसेच “अपघातग्रस्तांच्या मदतीला’ या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांच्या सतर्कतेमुळे वाहतूक सुरळीत होत आहे.