नवी दिल्ली- कामगार कायदे सौम्य करण्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने बुधवारी देशव्यापी आंदोलन केले. करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या कामगारांना त्वरित वेतन देण्यात यावे, अशी मागणीही मजदूर संघाने केली आहे. भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरांसमोर आणि सरकारी कार्यालयांसमोर रस्त्यांवर उभे राहून लॉकडाऊनच्या काळात वेतन न देण्याविरोधात जोरदार निदर्शने केली. लॉकडाऊनमुळे कामाचे तास वाढून नोकऱ्या कमी होण्याचाही त्यांनी निषेध केला.
देशातील 14 राज्यांमध्ये कामगार कायद्यामध्ये एकतर्फीपणे बदल करण्याचाही भारतीय मजदूर संघाने निषेध केला आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्राचे अघोषित खासगीकरण केले जात आहे, अशी टीकाही “बीएमएस’ने केली आहे.
कामगारांच्या दुर्दशेबाबत विचार करावा आणि त्वरित वेतन देण्याचे निर्देश द्यावेत. तसेच राज्य सरकारांकडून कामगार कायद्यात बदल करण्याबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि हे बदल करू देऊ नयेत, अशी मागणीही “बीएमएस’ने केंद्र सरकारकडे केली आहे.