दौंड तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींमध्ये संकेतस्थळात व्यत्यय : एका निविदेला दोन ते पाच हजार रुपयांची आकारणी
देऊळगावराजे – दौंड तालुक्यात मागील काही वर्षांपासून ई-निविदा प्रक्रिया थेट ठेकेदारांच्या हाती सोपवली आहे. राज्य सरकारच्या संकेतस्थळावर ग्रामपंचायतींऐवजी ठेकेदाराच कामाची निविदा अपलोड करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असल्यामुळे याचा अर्थ असा की, फक्त नावापुरती ई-निविदा प्रक्रिया आहे का, त्याचप्रमाणे आपल्या मर्जीतले ठेकेदारांना कामे मिळत आहेत.
दौंड तालुक्यात एकूण 80 ग्रामपंचायती असून राज्य सरकारच्या नियमानुसार तीन लाखांवर जी अधिक रकमेची कामे आहेत ती कामे ई-निविदा पद्धतीने करणे बंधनकारक आहे; परंतु तालुक्याच्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांना सरकारच्या संकेतस्थळावर डिजिटल सहीने संपूर्ण माहिती अपलोड करता येत नसल्याने काम करणाऱ्या ठेकेदाराच्या मदतीने निविदांची माहिती संकेतस्थळावर टाकली जात आहे, यासाठी एका निविदेला दोन ते पाच हजार रुपये घेतले जात आहेत.
यामध्ये असे दिसते आहे की ग्रामपंचायतीला तीन लाखांवरील विविध कामांच्या ई-निविदा प्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर माहिती टाकण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या डिजिटल सहीचे वापरले जाणारे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र हे बेकायदा पद्धतीने संबंधित ठेकेदाराला दिले जाते आणि तो ठेकेदार डिजिटल सहीच्या आधारे माहिती राज्य सरकारच्या संकेतस्थळावर टाकतो. यामुळे संबंधित ठेकेदाराला कोणत्याही भागातील ई निविदामधील कामे आपल्या नावावर घेणे सोपे जाते. ग्रामपंचायतीच्या कामात पारदर्शकता यावी, या हेतूने ई- निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.
मात्र, या संकेतस्थळावर ठेकेदारांची हुकमत असल्याचे स्पष्ट होत आहे. वास्तविक प्रशासनातील अधिकाऱ्यांना यासाठी प्रशिक्षण दिल्यास यातील गोलमाल बंद होण्यास मदत होणार आहे. ई- निविदा प्रक्रियेला बाधा पोहचविणाऱ्या ठेकेदारांना चाप बसणार आहे, तसेच गावपातळीवर कामांत सुसूत्रतता येण्यास चालना मिळणार आहे. यासाठी शासन स्तरावर याची प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. दौंड तालुक्यातील ग्रामपंचायतींना या ठेकेदारांचा फटका बसत असल्यामुळे प्रशासनातील दुवा असलेले अधिकारी यातून बाहेर पडत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
राज्य सरकारने तीन लाख रुपयांवरील कामाची ई-निविदा प्रक्रिया चालू केली आहे. दौंड पंचायत समितीमार्फत सरपंच, ग्रामसेवकांना या निविदा प्रक्रियाची माहिती समजवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे, त्यामुळे ई निविदा प्रक्रियेमध्ये जो भष्टाचार चालू आहे, तो थांबवण्यास मदत होईल. हे प्रशिक्षण घेण्यासाठी गटविकास अधिकारी दौंड यांना शिरापूर ग्रामपंचायतमार्फत निवेदन देण्यात येणार आहे.
– केशव काळे, उपसरपंच, शिरापूर.
मी स्वतः बैठका घेऊन ग्रामसेवकांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत की, डिजिटल सह्यांचे प्रमाणपत्र कोणालाही देऊ नये आणि स्वतः ई-निविदा प्रक्रिया राज्य शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे, याबाबत कोणतेही कारण देऊ नये.
– गणेश मोरे गटविकास अधिकारी, दौंड