महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत कामठे यांची घोषणा
दिवे- पुरंदर तालुक्यात गुंजवणीचे पाणी आणण्यासाठी आजपर्यंत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी एकाकी लढत दिली. आजारपणाशी झुंजत त्यांनी गुंजवणीचे काम मार्गी लावले. न्यायालयातही कॉंग्रेसच्या वाईट प्रवृत्तींचा सामना करत त्यांना हरवले. आता जनतेच्या न्यायालयात कॉंग्रेसला धुळ चारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महायुती भक्कमपणे मैदानात उतरणार असून शिवतारे यांच्या विजयासाठी आम्ही जीवाचे रान करणार आहोत असे प्रतिपादन महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केले.
पुण्याचे खासदार गिरीश बापट, भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले बाबाराजे जाधवराव, जालिंदर कामठे व शिवसेना-भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांची गुरुवारी (दि. 10) बैठक झाली. त्यानुसार महायुती शिवतारे यांच्यासाठी एकवटल्याचे दिसून आले. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, सभापती रमेश जाधव, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष पंडितदादा मोडक, पुरंदर तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, सेनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष दिलीप यादव, शिवसेना हवेलीचे नेते शंकरराव हरपळे, नियोजन मंडळ सदस्य गिरीश जगताप, जिल्हा चिटणीस राजेंद्र जगताप, हवेली भाजपा सरचिटणीस धनंजय कामठे, राहुल शेवाळे, पुरंदर सरचिटणीस संजय निगडे, हवेली कार्याध्यक्ष नितीन जांभळे, माजी उपसभापती निलेश जगताप, उपतालुकाप्रमुख,कैलास ढोरे, आरपीआयचे विष्णू भोसले, सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, बाळासाहेब भोसले, विनोद धुमाळ, पांडुरंग रोडे, संतोष हरपळे, कैलास जगताप, जालिंदर जगताप, पंकज धिवार, गणपत दगडे, संदिप बेलदरे, संदिप हरपळे, संदिप नवले यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी शिवतारे यांना जाहीर पाठींबा दिला. गांधीजींची कॉंग्रेस आता राहिलेली नाही. पुरंदर तालुक्यात कॉंग्रेसच्या नेतृत्वाने चुकीची संस्कृती रुजवली. गुंजवणीत खोडा घालण्याचा त्यांचा डाव न्यायालयानेही उधळून लावला आहे. आता पाणी येणार हे निश्चित असून वाईट प्रवृत्तींना दुर ठेवण्यासाठी मी शिवतारे यांना जाहीर पाठींबा देत आहे, असेही ते म्हणाले.
- पुरंदर तालुक्याच्या जनमनावर तीन दशके दादा जाधवराव यांनी राज्य केले आहे. कॉंग्रेसच्या वाईट प्रवृत्तीला त्यांनी सत्तेपासून दूर ठेवत सर्वसामान्यांना आधार द्यायचे काम केले. मागील दशकभर तेच काम मी करत आलोय. यापुढेही तेच करणार. माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका झाली तरी मी तालुक्याला विकासाच्या वाटेवरून ढळू देणार नाही.
-विजय शिवतारे, उमेदवार, शिवसेना, पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघ