पुणे, दि. 13 -गेल्या दहा बारा दिवसांपूर्वी सिंहगडावर फिरण्यासाठी गेलेल्या पुण्यातील कुटुंबीयांनी मोबाइलवर केलेल्या व्हिडीओ शुटिंगमध्ये रेकॉर्ड झालेले वाघाचे गुरगुरणे सत्य असल्याचे आज स्पष्ट झाले. कोंढणपूरच्या बाजूने गडावर जाणाऱ्या रस्त्यावर वाघ दिसल्याची तक्रार काही पर्यटकांनी पोलिसांत केल्याने व्हिडीओतील ते गुरगुरणे वाघाचेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पर्यटकांनी गडावर जाताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
पद्मावती येथे राहणारे वसीम अल्ताफ घोडके हे पत्नी व दोन मुलांसह सिंहगडावर फिरण्यास गेले होते. तेथे फिरताना त्यांनी मोबाइलमध्ये व्हिडीओ काढले. नंतर हेच व्हिडीओ पाहताना त्यांना त्यातील मागील बाजूला येणारा गुरगुरणारा आवाज वाघाचा वाटला. त्यांनी त्याबाबत सिंहगडावरील वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधून व्हॉट्सअपवर ते व्हिडीओ पाठवले.
याबाबत दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीने वन अधिकारी प्रदीप संपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता, “व्हिडीओमधील आवाज हा वाघाचा आहे. मात्र व्हिडीओची सत्यता पडताळून पाहावी लागेल’ असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आज कोंढणपूर रस्त्याने गडावर जाणाऱ्या रस्त्याला वाघ दिसल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये काही पर्यटकांनी केली. यावरून व्हिडीओतील तो आवाज सत्य असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
तेरा दिवसांपूर्वी पत्नी व दोन मुलांसह मी गडावर फिरायला गेलो होतो. त्यावेळी काढलेल्या व्हिडीओमध्ये वाघाचा आवाज स्पष्ट येत आहे. ही बाब मी वनअधिकारी भेटून सांगितली. मात्र त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्या दिवशी नशीब बलवत्तर म्हणून आमचे जीव वाचले.
– वसीम घोडके