मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापन दिन काल जल्लोषात पार पडला.वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी ठाण्यातील गडकरी रंगायथन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गेल्या काही महिन्यातील राजकीय वातावरण पाहता राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत.कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी चांगलीच टोलेबाजी केली. मात्र २२ मार्चला आपण सविस्तर बोलणार असल्याचे स्पष्ट केले. वर्धापन दिनाचे औचित्य साधत काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना थेट वाघ भेट दिल्याचे पाहायला मिळाले.
वर्धापनदिनी मनसैनिकांनी राज ठाकरेंना आगळीवेगळी भेट दिली आहे. या भेटीची सध्या संपूर्ण राज्यभर चर्चा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस बाळा गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज ठाकरेंना थेट वाघाचा पुतळा गिफ्ट दिला आहे. या पुतळ्याची उंची सुमारे तीन ते चार फूट इतकी आहे. तसेच तब्बल महिन्याभराचा कालावधी हा वाघ बनवण्यासाठी लागला असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. हे गिफ्ट स्वीकारताना समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राज ठाकरे वाघनखे देखील घालताना दिसत आहेत.
हे अनोखे गिफ्ट राज ठाकरेंना देताना कार्यकर्त्यांनी आधी त्यांचा सन्मान केला. यावेळी भगवी शाल देखील कार्यकर्त्यांच्यावतीने ठाकरेंना देण्यात आली. भविष्यात राज ठाकरेंची डरकाळीच महाराष्ट्रातलं राजकारण ठरवणार असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
सत्तेत येण्याची ठाकरेंकडून ग्वाही
जनता सध्याच्या राजकीय तमाशांना विटलेली आहे. आपण फक्त त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा महानगर पालिका निवडणुका लागतील, तेव्हा मनसे सत्तेत असणार असा विश्वास राज ठाकरेंनी वर्धापन दिनानिमित्त व्यक्त केला. तसेच आता जास्त काही न बोलता २२ मार्चच्या गुडी पाडवा मेळाव्यात बोलणार असल्याची आठवण देखील यावेळी राज ठाकरेंनी करून दिली.