चंद्रपूर – आपल्या परिसंस्थेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्राणी अक्षरश: “करो या मरो’ या ध्येयाने झुंजतात आणि त्यासाठी प्राणांची पर्वाही करत नाहीत. हाच प्रकार 14 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत खडसंगी नियतक्षेत्रातील वाहनगाव येथे घडला. केलेल्या शिकारीवरून दोन वाघात जुंपली आणि त्यात एकाला जीव गमवावा लागला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.
हा थरार घडला सुभाष दोडके यांच्या शेतात. मृत वाघाला पाहण्यासाठी स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली. मृत्यूमुखी पडलेल्या वाघाचे नाव बजरंग, असे असून, तो ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील असल्याचे समोर आले आहे. तर जखमी वाघाचे नाव “छोटा मटका’ उर्फ “सीएम’ असे आहे.
छोटा मटकाने बैलाची शिकार केली होती. या शिकारीवरून या दोन्ही वाघांमध्ये टोकाची झुंज झाली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. धिप्पाड शरीरयष्टीचा “बजरंग’ हा वाघ ताडोबाची शान होता. त्याचे या भागात साम्राज्य होते, परंतु “छोटा मटका’ पुढे तोही हरला आणि मृत्यूमुखी पडला.
वाघांच्या झुंजीचा हा थरार घडत असताना आसपास शेतकरी कामात गुंतलेले होते. पण आवाज झाल्याने ते सतर्क आणि गावकरी घटनास्थळी गेले. त्यावेळी त्यांना एक वाघ तेथून जखमी अवस्थेत जाताना दिसला. तर दुसरा वाघ मृतावस्थेत आढळला. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने दाखल झाले.
बजरंग याचे वय सुमारे सात वर्षे होते. या झुंजीत तो रक्तबंबाळ झाला होता. त्याच्या अंगावर जखमा होत्या आणि चावा घेतल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्या झुंजीत त्याचा मृत्यू झाला असावा, असा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे.