पुणे: आठवीत शिकणाऱ्या मुलाशी अश्लील चाळे करणाऱ्या शिपायाला तीन वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी.अगरवाल यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
सुभाष रामदेवजी पारिक (वय 60, रा. शिरगाव, ता. मावळ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित 13 वर्षीय मुलाच्या वडिलांनी तळेगाव दाभाडे पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलगा, त्याच्या आई-वडिलांची साक्ष आणि मुलाने वडिलांना पाठविलेला ई-मेलचा पुरावा महत्त्वाचा ठरला.
सहायक पोलीस निरीक्षक व्ही.आर. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना सत्र न्यायालय पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल नितीन पवार यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. फिर्यादी मुंबई येथील रहिवाशी असून, त्यांचा मुलगा शिरगाव येथील शाळेत शिकत होता. 7 एप्रिल 2015 रोजी दुपारी 4 च्या सुमारास तो ग्रंथालयात गेला. त्यावेळी तो एकटा असल्याचे पाहून तेथील शिपायाने त्याच्याशी अश्लील चाळे केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 8 नुसार शिक्षा सुनावली.