वेल्हे – कोदवडी (ता.वेल्हे) येथे शुक्रवारी (दि.3) झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात 1 लाख 25 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज गुन्हा दाखल होताच अवघ्या पाच तासात वेल्हे पोलिसांनी अत्यंत शिताफीने सुपरफास्ट कामगिरी करीत गुन्ह्यातील विठ्ठल बजरंग शेंडकर (रा. अस्कवडी), दिगंबर लक्ष्मण ननवरे (रा.आस्कवडी) व वसंत सोपान राजिवडे (रा. दामगुडा आसनी) या तीनही आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केले. वेल्हे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि. 3) शिखर सुर्यप्रकाश गुप्ता (रा.विश्रांतवाडी, पुणे) व त्यांचे चार मित्र कोदवडी (ता.वेल्हे) येथील मंत्रा रिसॉर्टला फिरण्यासाठी त्यांच्या इरटिगा गाडीने आले होते.
गाडीचालक अमोल लोंढे यांनी शिखर गुप्ता व त्यांच्या मित्रांना रिसॉर्टमध्ये सोडून मार्गासनी येथे गेले. मार्गासनीहून मंत्रा रिसॉर्टला परतत असताना अस्कवडी गावाच्या हद्दीतील लोखंडी पुलाजवळ गाडी रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. अपघातग्रस्त इरटिगा गाडी ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढताना मदतीसाठी जमलेल्या जमावातील अज्ञात इसमाने साहित्यासह 1 लाख 25 हजार 500 रूपयांचा ऐवज असलेली काळी बग चोरून नेली. शिखर गुप्ता यांनी याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. 6) सकाळी 10 वाजता तक्रार दाखल केली.
त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांच्या तपास पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवून आज दुपारी दोन वाजता तीनही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, हवालदार बांदल, गुंडगे, पोलीस नाईक औदुंबर अडवाल, पोलीस कॉन्स्टेबल अभय बर्गे, होमगार्ड गायकवाड यांनी केला.