अहमदाबाद – कॅनडाच्या सीमेवरून अमेरिकेत बेकायदा प्रवेश करण्याच्या प्रत्नात गारठून मरण पावलेल्या चार गुजराती बांधवांच्या प्रकरणातील तपासात अनेक धक्कादायक माहिती ऊघड होऊ लागली आहे. एका स्थानिक एजंटने 10 कुटुंबांना अमेरिकेत पाठवले आहे. त्यातील तीन कुटुंबाचा ठावठिकाणा अद्याप लागत नाही. येथून पश्चिमेचा प्रवास सुरू केल्यानंतर त्यांनी एकदाही नातेवाईकांशी संपर्क साधला नाही.
जगदिश पटेल (वय 35), पत्नी वैशाली (वय12), विहंग (वय12) आणि धार्मिक (वय3) यांच्या मृत्यूची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केली आहे. ते सर्व जण गांधीनगर मधील नवडिंगुचा तालुक्यातील कलोल गावाचे रहिवासी आहेत. त्यांच्या मृत्यूने कॅनडातून अमेरिकेत मानवी तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरणाचा एक भाग असल्याचे निष्पन्न झाले होते.
उणे 35 अंश तापमानात कॅनडाच्या सीमेवरून अमेरिकेत घुसखोरी करण्यासाठी एक गट जात होता. त्यांच्यापासून पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांची ताटातूट झाली. त्या चौघांचे मृतदेह अमेरिकेच्या सीमेपासून 10 किमी अंतरावर सापडले होते.
पोलिसांनी अद्याप या स्थानिक एजंटचे नाव उघड केले नाही. त्याने पटेल कुटुंबियांना जानेवारी महिन्यात कॅनडाला पाठवले होते. हा एजंट आधी श्रीलंका आणि सिंगापूरला माणसे पाठवत असे. गेल्या चार वर्षापासून तो कॅनडामार्गे अमेरिकेला माणसे पाठवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आपला व्यवसाय पर्यटनाचा अधिकृत असल्याचे भासवण्यासाठी थायलंडसारख्या देशांत पर्यटन व्हीसावर पाच दिवस किंवा आठवड्याच्या टूर तो आयोजित करत असे. त्यानंतर तो त्यांना कॅनडात पाठवत असे. तेथून मोटारी अथवा व्हॅनने अमेरिकेत त्यांची तस्करी करत असे.
कलोल या गावाची लोकवस्ती सुमारे 3600 आहे. तेथील आणि आजूबाजूची किमान 10 कुटुंबांना या एजंटने कॅनडाला पाठवले आहेत. मात्र त्यातील तीन कुटुंबे बेपत्ता असल्याचे स्थानिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
या भागात अमेरिकेत स्थायिक होण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. त्यासाठी कितीही किंमत मोजायची त्यांची तयारी आहे. ते पूर्ण करण्यासाठी व्हिसाशिवाय अमेरिकेत पाठवण्याचे खोटे आश्वासन देतात असे पोलिसांनी सांगितले.
हे एजंट प्रत्येक प्रौढ व्यक्तीमागे अमेरिकेला पाठवण्यासाठी 70 लाख रुपये आणि लहान मुलांसाठी 25 लाख रुपये स्वीकारतात. स्थानिक एजंट, मुंबईतील एजंट आणि कॅनडा किंवा अमेरिकेतील एजंट अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून पूर्ण रक्कम घेत असतात, असे स्थानिक सूत्रांनी सांगितले. पटेल यांच्या कुटुंबासाठी दीड कोटी रुपये दिले असण्याची शक्यता आहे.
गुजरात सीायडीशिवाय अमेरिका आणि कॅनडाच्या तपास यंत्रणाही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या प्रयत्नात आहेत.