बालिकेसह तीन जण जखमी; महामार्गावर खोडशीजवळ अपघात
कराड – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टेम्पोने ऊस कामगार घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला खोडशी गावच्या हद्दीत पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात टेम्पोचालक पुट्टाप्पा जयाप्पा बेनकनशेट्टी (वय 35, रा. आळगवाडी, ता. रायबाग, जि. बेळगाव) आणि ट्रॅक्टरमधील नामदेव किसन साखरे (वय 40, रा. तांदूळवाडी, ता. धारूर, जि. बीड) व कृष्णात महादेव काळे (वय 28) हे ठार झाले, तर शांताराम अच्युतराव चव्हाण (वय 35), राजमती विष्णू काळे (वय 25), ताई विष्णू काळे (वय 4) हे जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 5) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऊस कामगार ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून बुधवारी रात्री पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर बाजूकडून पुण्याच्या दिशेने निघाले होते. ट्रॅक्टर-ट्रॉली खोडशी गावच्या हद्दीत आल्यावर पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने (केए-22-डी-1878) ट्रॅक्टरला (एमएच-44-एस-2831) पाठीमागून जोराची धडक दिली.
टेम्पोचालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये टेम्पोचालक पुट्टाप्पा बेनकनशेट्टी व ट्रॅक्टरमधील नामदेव साखरे हे जागीच ठार झाले, तर कृष्णात काळे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ट्रॅक्टरमध्ये बसलेले ऊसतोड कामगार शांताराम चव्हाण, राजमती काळे व ताई काळे ही बालिका जखमी झाली. हायवे हेल्पलाइनचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, योगेश पवार, जितेंद्र भोसले यांच्या मदतीने जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली. हवालदार प्रशांत जाधव व खलील इनामदार यांनी पंचनामा केला. बी. के. इनामदार तपास करत आहेत.