मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची माहिती
पुणे – गुन्ह्यांचे स्वरूप बदलत असल्याने रेल्वे मंत्रालयाने देशात सहा ठिकाणी “सायबर क्राइम सेल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी देशातील पहिला सेल पुण्यात सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, यामध्ये तज्ज्ञांचा सहभाग आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हडपसर टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात ते जूनपर्यंत पूर्णत्वास येणार आहे, असेही मित्तल म्हणाले. बनावट ओळखपत्रांच्या आधारे रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुकिंग करुन ते महागड्या किमतीने विकले जात असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस आले आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. दिवसेंदिवस गुन्हे करण्याचे स्वरूप बदलत असून त्याचा छडा लावण्यासाठी आरोपींचा सीडीआर काढणे, त्यांचे टॉवर लोकेशन तपासणे आदींची तातडीने गरज पडते. त्याकरिता आता रेल्वे मंत्रालयाने देखील सायबर सेल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मित्तल यांनी नमूद केले.