कोरेगाव (प्रतिनिधी) – खंडाळा-शिरोळ (जयसिंगपूर) राज्य मार्गावर एकसळ-न्हाळेवाडी गावानजीक मंगळवारी (दि. 9) सायंकाळी 5 च्या सुमारास रस्त्याकडेला मोटारसायकल उभी करून गप्पा मारत असलेल्या तिघांना चुकीच्या दिशेने आलेल्या मारुती व्हॅनने जोरात ठोकर दिली. या भीषण अपघातात कोरेगावातील बांधकाम ठेकेदार आबा महिपती तुपे (वय 44) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजू जाधव व दीपक दिलीप पवार हे जखमी झाले आहेत. जखमींपैकी पवार यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत माहिती अशी, खंडाळा-शिरोळ (जयसिंगपूर) राज्य मार्गावर एकसळ-न्हाळेवाडी गावानजीक राजू जाधव यांचा फळ विक्रीचा स्टॉल आहे. कोरेगावातील व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी जाधव हे मोटारसायकलवरून निघाले होते. त्याच वेळी आबा महिपती तुपे व दीपक दिलीप पवार हे एका मोटारसायकलवरून कोरेगावकडे चालले होते. तुपे व जाधव हे मित्र असल्याने त्यांनी मोटारसायकली रस्त्याकडेला उभ्या केल्या आणि ते गप्पा मारत उभे होते.
त्यावेळी कोरेगावकडून शिरंबेकडे निघालेल्या मारुती व्हॅनचा (एमएच- 15-बीडी-7462) चालक विशाल महामुलकर याचा स्टीअरिंगवरील ताबा सुटून भरधाव व्हॅनने तिघांना जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, तिघेही जागेवरून उडून रस्त्याकडेला असलेल्या चारीत जाऊन पडले.
यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने कोरेगावातील रुग्णालयात नेले. तेथे आबा तुपे हे मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी राजू जाधव यांच्या फिर्यादीवरुन विशाल महामूलकर (रा. वेलंग, शिरंबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम तपास करत आहेत.