पुणे – नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिणकडे सरकला असून, पुढील दोन दिवस नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तर कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ वैशाली खोब्रागडे यांनी दिली.
उत्तर छत्तीसगड आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील तीन ते चार दिवस कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तर नागपूर आणि चंद्रपूरमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर काही भागात पावसाची भुरुभुरु सुरू होती. शहराच्या मध्यवर्ती भागात दुपारनंतर हलक्या सरी पडल्या. सलग दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींमुळे तापमानात घट झाली असून, हवेत गारवा वाढलेला आहे.