अयोध्या – अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी देशभरातून रामभक्त अयोध्येत येण्याची शक्यता आहे. या भव्य सोहळ्याला साक्षीदार होण्याच्या उद्देशाने अयोध्येतील हॉटेलांमध्ये आतापसून ऍडव्हान्स बुकींग सुरू झाले आहे.
अयोध्या जिल्ह्यातील अनेक हॉटेलांमध्ये पुढील वर्षी 14 ते 25 जानेवारीसाठी हॉटेलांचे आताच आरक्षण करण्यात आले आहे. हॉटेलांमध्ये बुकींग करण्यासाठी ट्रॅव्हल एजंटांनी आतापासून नियोजन केले आहे. राम मंदिराचे उद्घाटन नक्की कधी होणार याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
मात्र तरी 14 ते 25 जानेवारी दरम्यानची तारीख निश्चित होईल, असा अंदाज धरून पर्यटकांनी आणि रामभक्तांनी आतापासून लगबग सुरू केली असल्याचे अयोध्येतील वातावरणावरून लक्षात येते आहे. या उद्घाटन सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन रिसॉर्ट आणि हॉटेल व्यवसायिकांनीही आतापासून आपली हॉटेल चकाचक करायला घेतली आहेत.
ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी अनेकांना 10-12 दिवस हॉटेल बुक करायचे आहे. गेल्या काही दिवसांपासून ही चौकशी सुरू झाली असल्याचे काही हॉटेल व्यवसायिकांनी सांगितले. विभागीय आयुक्त गौरव दयाल यांनी बुधवारी अयोध्येतील हॉटेल मालकांची तयारीसाठी बैठक बोलावली आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी हॉटेल सजवण्याच्या सूचना दिल्या.
राम ललाच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त 10 दिवसांचा धार्मिक सोहळा अयोध्येमध्ये चालणार आहे. मंदिर उद्घाटनाच्या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्री, परदेशी अतिथी येणार आहेत. त्याशिवाय बंदोबस्तासाठीचे पोलीस, सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असतील. रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दलासारख्या हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने ुपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मोठ्या संख्येने येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी
फैजाबाद आणि अयोध्येमध्ये सुमारे 150 हॉटेल आहेत, यात 10 आलिशान हॉटेल, 25 बजेट हॉटेल, 115 इकॉनॉमी हॉटेल, 35 बिगर नोंदणीकृत गेस्ट हाऊस, 50 धर्मशाळा, 50 घरगुती गेस्ट हाऊस अशी एकूण 10 हजार खोल्या अयोध्येमध्ये आहेत. याव्यतिरिक्त, सुमारे 35 खोल्या असलेली चार सरकारी अतिथीगृहे आहेत. सध्या बांधकाम सुरू असलेली सुमारे 50 छोटी गेस्ट हाऊस नोव्हेंबरपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.