बीजिंग – ‘वन चायना या धोरणाला विरोध करणाऱ्यांना याबाबतची किंमत मोजावी लागेल, अशी धमकीच चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांनी दिली आहे. चेक प्रजासत्ताकचे वरिष्ठ अधिकारी तैवानच्या दौऱ्यावर जाणे म्हणजे चीनला चिथावणी देणे आणि दूरदृष्टीचा अभाव असलेली कृती असल्याचेही वॅंग यी यांनी म्हटले आहे.
तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे. ‘वन चायना’धोरणाला विरोध करणारा 1.4 अब्ज चिनी नागरिकांचे शत्रुत्व ओढवून घेईल. तसेच आंतरराष्ट्रीय विश्वास आणि आचरणाचेही हे उल्लंघन असेल, असेही वॅंग यी यांनी म्हटले आहे.
मात्र अमेरिकेचे आरोग्य मंत्री अलेक्स अझर हे तैपेईच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हापासून तैवानच्या मुद्दयावरून चीन सरकारवरचे दडपण वाढले आहे. अमेरिकेने 1979 पासून तैवानची स्वतंत्रपणे ओळख स्वीकारली. तेव्हापासून प्रथमच अमेरिकेच्या एखाद्या वरिष्ठ मंत्र्याने तैवानला भेट देऊन अध्यक्षा आणि तैवानच्या स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या त्साई इंग-वेन यांची भेट घेतली होती. अझर यांची भेट म्हणजे ‘वन-चायना’ धोरणाला दिले गेलेले पहिले आव्हान असल्याचे चीनला वाटते आहे.
अझर यांच्यानंतर चेक प्रजासत्ताकच्या संसदेचे सभापती मिलोस व्हिस्ट्रील यांनी चीनच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून रविवारपासून तैवानच्या दौऱ्याला सुरुवात केली आणि तेथील अधिकाऱ्यांची भेटही घेतली. व्हिस्ट्रील यांनी चेक प्रजासत्ताकचे अध्यक्ष मिलोस झेमन यांचा विरोध डावलून हा दौरा केल्याची चिनी प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.