पिंपरी – पिंपरीतील एका खासगी रुग्णालयातील करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या 42 डॉक्टर व 50 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रिक्षा चालकावर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर तो चालक करोना बाधित असल्याचे समोर आले होते. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. संबंधित रुग्णावर उपचार करणारे 42 डॉक्टरांचा करोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर आता याच रुग्णालयातील 50 कर्मचाऱ्यांचाही तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रिक्षाचालकाचा अपघात झाला होता. त्याच्यावर पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याचे ऑपरेशन करीत असताना या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रिक्षा चालकाची करोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. या रुग्णावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे खासगी रुग्णालयातील 42 डॉक्टर आणि 50 कर्मचारी हे संबंधिताच्या संपर्कात आले होते. त्यांना रुग्णालयीन प्रशासनाने इतर कुणाच्याही संपर्कात न येता खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी ठेवले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर शहरात भीतीचे वातावरण पसरले होते.
करोना बाधित रुग्णावर उपचार करणाऱ्या 42 डॉक्टर व 50 कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 42 डॉक्टरांचे रिपोर्ट सोमवारी (दि. 6) निगेटिव्ह आले आहेत. त्यानंतर आज रुग्णालयातील 50 कर्मचाऱ्यांचे तपासणी अहवालही निगेटिव्ह आले. तसेच मंगळवारी दाखल केलेल्या 19 संशयित रुग्णांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.