- गर्दी रोखण्याचे प्रयत्न ः चिंचवडमध्ये निम्मेच गाळे सुरु राहणार
पिंपरी – करोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दीला अटकाव करण्यासाठी आता पिंपरी मंडई ही पहाटे 3 सकाळी 7 या वेळेतच खुली ठेवण्यात येत आहे. चिंचवड येथील भाजी मंडई मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळत दिवसभर सुरू आहे. परंतु दिवसाआड प्रमाणे निम्मेच गाळे सुरु राहणार आहेत.
पिंपरी येथील भाजी मंडई यापूर्वी दिवसभर सुरू राहत होती. येथे वाजवी दरात भाजी मिळत असल्याने नागरिकांची गर्दी असते. पर्यायाने सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा वाजले. त्यावर उपाय म्हणून सध्या मंडईचा वेळ मर्यादित करण्यात आली आहे. पहाटे 3 ते सकाळी 7 ही वेळ सध्या निश्चित करण्यात आली आहे. या वेळेत भाजी घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अत्यल्प आहे. या वेळेत येऊन शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भाजी विक्री करणारे विक्रेते होलसेल दरात भाजी घेऊन जातात.
एकावेळी फक्त पाच ग्राहक
चिंचवड येथील भाजी मंडईतील 48 गाळ्यांपैकी प्रत्येकी 24 याप्रमाणे दिवसाआड गाळे सुरू ठेवण्यात आले आहेत. मंडईतील गर्दी टाळण्यासाठी एकावेळी फक्त पाच ग्राहकांनाच भाजी खरेदीसाठी मंडईत सोडले जात आहे. त्यांनी भाजी खरेदी केल्यानंतर पुढील ग्राहकांना भाजी घेण्यासाठी मंडईत प्रवेश दिला जात आहे. चिंचवड येथील भाजी मंडईत दररोज होणारा भाज्यांचा लिलाव आणि दलाली सध्या बंद झाली आहे. मंडईत गर्दी होऊ नये यासाठी होमगार्ड आणि पोलीस आवश्यक दक्षता घेत आहेत. मास्क किंवा रुमाल घातल्याशिवाय मंडईत कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
पिंपरी येथील भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. त्या ऐवजी घराजवळील भाजी विक्रेत्यांकडूनच भाजी खरेदी करावी. पिंपरीत भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने सध्या भाजी विक्रीची वेळ मर्यादित केलेली आहे.
– सुनील कुदळे, अध्यक्ष, लालबहादूर शास्त्री भाजी मंडई.