सातारा – प्राथमिक शिक्षक बॅंक ही तमाम शिक्षकांची मातृसंस्था असून मोठ्या कष्टाने पूर्वासिनी उभारलेले हे सहकार मंदिर असताना अस्ताला जाऊ द्यायचे नसेल तर शनिवारच्या मतदानात क्रांती घडवावी व कपबशीच्या चिन्हावर शिक्का मारून बॅंक वाचवण्याच्या पवित्र कार्यात हातभार लावावा आणि ही आरपारची लढाई यशस्वी करावी, असे भावनिक आवाहन जेष्ठ शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी केले आहे.
शिक्षक बॅंक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई येथील सांगता प्रचार सभेत थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे होते. बॅंकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील, दोंदे गटाचे दीपक भुजबळ, संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सरचिटणीस सुभाष ढालपे, समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, सरचिटणीस किरण यादव, शंकरराव देवरे, विठ्ठल फडतरे, प्रदीप कदम, सतीश नलावडे, किरण यादव, मनोहर माने, तानाजी कुंभार आदी उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले, गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीत जिथे जाऊ तिथे प्रत्येक ठिकाणी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता सभासदांची भूमिका स्पष्टपणे लक्षात येत आहे. यावेळच्या निवडणुकीत क्रांती घडेल व आपल्याच विचारांचे सर्व 21 उमेदवार निवडून येतील. शिक्षक संघ व समितीची वैचारिक नाळ व रक्तगट एकच आहे. शिक्षकांच्या, बॅंकेच्या हितासाठी व भ्रष्ट लोकांना हद्दपार करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
बी. एस. कणसे, सदाशिव कणसे, रामभाऊ सोळसकर, संदीप राऊत, राजेंद्र कणसे, शरद बेसके, राणी पाटील, स्वाती चव्हाण आदींसह प्रमुख शिक्षक नेत्यांनी पॅनलला दिलेला पाठिंबा विजयी निकालाचे द्योतकच आहे. सत्ताधारी गटातील शेकडो कार्यकर्ते सभासद परिवर्तन पॅनलमध्ये प्रवेश करीत आहेत. उदय शिंदे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी पॅनेलच्या नावात विकास हा शब्द वापरला आहे. पण त्यांनी फक्त स्वतःचा व साथीदारांचा विकास केला आहे. त्यांच्या या गैरकारभाराला ब्रेक लावण्याचा निर्णय सभासदांनी घेतला आहे. त्यामुळे बॅंकेत आता परिवर्तन अटळ आहे. दीपक भुजबळ यांनी बॅंकेच्या माध्यमातून शिक्षक भवन’ची पुनर्रचना करण्यात येणार असून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील, असे सांगितले.
यावेळी सुभाष शेवाळे, नवनाथ भरगुडे, विलासराव घोलप, मोहन सातपुते, शशिकांत कांबळे, अंकुश नांगरे, अरूण पाटील, हणमंत साळुंखे, विनायक चव्हाण, नारायण शिंगटे, कृष्णाजी गुरव, सुदाम साळुंखे, उद्धव पवार, बसवराज दोडामणी, गणेश जाधव, कृष्णात हिरवडे आदी उपस्थित होते.