पुणे: शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील व्यावसायिक, व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या करोना चाचण्या करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
अनलॉक-2 नंतर शहरात वर्दळ वाढली आहे. खरेदीसाठीही गर्दी वाढत आहे. यात एखाद्या व्यावसायिकाचा कर्मचारी अथवा स्वत: व्यावसायिकच करोना बाधित निघाल्यास आणि लक्षणे दिसत नसल्यास त्यांच्याकडून करोनाचा प्रसार होण्याची शक्यता असून, ते “सुपर स्प्रेडर’ ठरू शकतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने भवानी पेठ तसेच करोना बाधितांची जादा संख्या असलेल्या पेठांच्या परिसरात व्यावासायिकांच्या रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट सुरू केल्या आहेत.
त्यात, मागील दोन दिवसात अनुक्रमे 300 आणि 250 चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत चौघांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले, तसेच या पैकी कोणालाही करोनाची लक्षणे नव्हती. त्यामुळे वेळीच हे सर्व बाधित विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.