प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 16 – दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या पुणे रेल्वे स्थानकात चोरट्यांनीच बस्तान मांडले आहे. जानेवारी ते जुलै-2022 काळात प्रवाशांच्या साहित्य चोरीच्या 282 तक्रारी रेल्वे पोलिसांकडे नोंदवल्या गेल्या. पण, त्यापैकी फक्त 38 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. त्यामुळे चोरट्यांचा मुक्त वावर आणि पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष प्रवाशांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. चोरींच्या घटनांमध्ये सोनसाखळी, बॅग, पैशांची पाकिटे आणि सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटनांच्या तक्रारी दाखल आहेत.
चोरीच्या घटना
विशेषत: प्रवासी झोपले असताना चोरीच्या घटना जास्त घडतात. काही ठिकाणी रेल्वे थांबवून लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. तर काही वेळेस स्थानकावर उभ्या रेल्वेत घुसून लुटीच्या घटना घडल्या आहेत.
आरपीएफ, जीआरपी पथकांची नुसतीच गस्त
प्रवाशांच्या आणि रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आरपीएफ आणि जीआरपी असे दोन पोलीस पथक रेल्वेत आणि स्थानकावर तैनात असतात. पण तरीही चोरीच्या घटना या परिसरात घडताना दिसतात. पुणे स्टेशन आवारात होणाऱ्या चोरीच्या प्रत्येक घटनेची नोंद पोलीस स्थानकात होतेच, असे नाही. काही वेळेस छोट्या-मोठ्या चोरीनंतर बहुतांश प्रवासी वेळ जाईल, रेल्वे सोडावी लागेल या भीतीने तक्रार दाखल करत नाहीत. काही प्रकरणात पोलीस देखील तक्रार दाखल करून घेत नाहीत.
फक्त 14 टक्के प्रकरणात कारवाई
पुणे स्थानकांतील प्रवाशांची रोजची संख्या पाहिली असता, पोलीस स्थानकात चोरीच्या घटनांची आकडेवारी ही कमी दिसते. पण, ज्या तक्रारी दाखल झाल्या; त्यापैकी केवळ 13.47 म्हणजे जवळपास 14 टक्केच तक्रारींचा निपटारा झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे या चोरट्यांकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महिना, दाखल गुन्हे
आणि उकल (सन 2022)
जानेवारी – 21 – 3
फेब्रुवारी – 29 – 4
मार्च – 24 – 1
एप्रिल – 32 – 9
मे – 52 – 7
जून – 76 – 8
जुलै – 48 – 6