पुणे – शहरात घातपाती कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या दोन दहशतवाद्यांकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांचे साहित्य जप्त केले आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांचे ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्याच्या तयारीत दहशतवादी असल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.
कोथरूडमध्ये पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांचा पुण्यात कोठे वावर होता, याची माहिती घेण्यात येत आहे. मोहंमद युनूस मोहंमद याकू साकी (24), मोहंमद इम्रान मोहंमद युसूफ खान (23, दोघे सध्या रा. कोंढवा) होते. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (31) पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दोघांकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळ्या, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला आहे.