नेवासा, (प्रतिनिधी) – भेंडा (ता.नेवासा) येथील हॉटेल यशदिप परमिट रुम बियरबारमध्ये जेवणासाठी आलेल्या दोघा जणांनी वाद घालत इतर ग्राहकांना शिवीगाळ केली. हॉटेलमध्ये आलेल्या इतर ग्राहकांना त्रास नको म्हणून समजून सांगण्यास गेलेल्या हॉटेलचे संचालक अतुल खाटीक यांच्यावर एकाने दगड उचलून फेकून मारला तर दुसऱ्याने खिशातील चाकू काढून खाटीक यांच्या पोटात खुपसावून गंभीर जखमी केल्याची घटना भेंडा येथे घडली.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जखमी खाटीक यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (दि.९) सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
कुकाणा (ता.नेवासा) येथील साहिल बशीर पठाण व जाफर बशीर सय्यद हे जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेले होते. जेवण करताना अचानक या दोघांमध्ये शिवीगाळ व वाद सुरू झाला. हॉटेलात आलेल्या ग्राहकांनाही या दोघा जणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार हॉटेलचे संचालक अतुल खाटीक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या दोघांना समजावून सांगितले असता खाटीक यांनाच पठाण व सय्यद या दोघा जणांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
हॉटेलचे व्यवस्थापक विजय चितळे यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली. खाटीक यांची जाफर सय्यद याने गचांडी धरली तर साहिल पठाण याने खिशात असलेला चाकू काढून अतुल खाटीक यांच्या पोटात खुपसून रक्तबंबाळ केले. हा थरार पाहून हॉटेलमधील कामगार आणि ग्राहक हॉटेलच्या बाहेर आले.
हा गोंधळ सुरू असतानाच तातडीने नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मोठा रक्तस्राव होत असल्यामुळे जखमी अतुल खाटीक यांना पुढील उपचारार्थ नगरला हलविण्यात आले. या घटनेतील दोघा जणांना पोलिसांनी अटक केली असून, आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. याबाबत शुभम दिलीप खाटीक (रा. पाथरवाला, ता.नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.