पुणे : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महापालिकेच्या (PMC) माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या बचतगटांनी मोलाची भूमिका बजाविली आहे. मात्र, बचतगटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना केवळ सण-उत्सवांच्या दिवसात बाजारपेठ उपलब्ध करून न देता पूर्ण वर्षभर विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधूरी मिसाळ (Mla Madhuri Misal) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली. तसेच, अशा बचत बाजारांसाठी आवश्यक असलेला निधी राज्यशासनाच्या माध्यमातून मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
महापालिकेच्या (PMC) समाज विकास विभागाच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने शहरातील बचतगटांसाठी शहरात पाच ठिकाणी दिवाळी बचत बाजारांचे आयोजन करण्यात आले आहे. सिंहगड रस्त्यावरील पू.ल देशपांडे उद्यानातील या उपक्रमाचे उद्घाटन आमदार मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास, मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, असंग पाटील, रामदास धावडे, राजेंद्र मोरे, विवेकानंद बडे, यांच्यासह बचतगटांच्या महिला यावेळी उपस्थित होत्या. (Pune News)
येत्या 8 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन सुरू असणार आहेत. पाच ठिकाणी भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात तब्बल 649 हून अधिक बचतगट सहभागी झाले आहेत. दरवर्षी महापालिकेच्या या बचत बाजारात जवळपास 50 लाखांपेक्षा अधिकची उलाढाल होते. मात्र, करोनामुळे दोन वर्षे हे बाजार बंद असल्याने बचतगटांना त्याचा मोठा फटका बसला होता. मागील वर्षीही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला तरी यंदा प्रशासनाने जास्तीत जास्त बचतगटांना संधी उपलब्ध करून दिली असून या बचत बाजारांमध्ये पणत्या, आकाशदिवे, कपडे, दिवाळीसाठीचे इतर साहित्य बचतगटांकडून रास्त भावात विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले असून जास्तीत जास्त पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी केले आहे.
इथे भरलेत बचत बाजार
पु.ल देशपांडे उद्यान – सिंहगड रस्ता
टेलीफोन एक्सचेंजच्या समोर , बाणेर
नवीन भाजी मंडई- वडगावशेरी
नथूजी मेंगडे जलतरण तलाव , कर्वेनगर
कात्रज दूध डेअरी मैदान , – कात्रज