नगर – महामार्गांच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज बंद पाळण्यात आला. त्याबरोबर अनेक संघटनांनी व ग्रामपंचायतींनी आपल्या पाठिंब्याचे पत्र आमदार लंके यांना दिले. त्यामुळे आंदोलनाला व्यापक सुरू येण्यास आता सुरूवात झाली आहे. प्रशासनाने आजही आ. लंके यांची भेट घेवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र अधिकाऱ्यांना रस्त्यांची कामे सुरू करण्याबाबत ठोस आश्वासन न देता आल्याने आ. लंके आपल्या उपोषणावरठाम राहिले असून रस्त्यांची कामे सुरू झाल्याशिवाय उपोषण सुटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली अहो.
नगर -पाथर्डी -नांदेड निर्मळ, नगर- राहुरी-कोल्हार – शिर्डी – कोपरगाव, नगर- मिरजगाव – चापडगाव – करमाळा -भुणी, नगर- पाथर्डी- शेवगाव या राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती तातडीने करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही लंके यांचे उपोषण सुरूच होते. आज दिवसभरात अनेक संघटनांनी व ग्रामपंचायतींनी आ. लंके यांना पाठिंब्याचे पत्र दिले. उपोषणाला समर्थन देण्यासाठी पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावे गुरुवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती.
पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी शहर, खरवंडी, मीडसांगवी, करंजी ही प्रमुख बाजारपेठ असलेल्या गावांसह अनेक गावांमध्ये बंद पुकारण्यात आला होता, असे उपोषणाला बसलेले पाथर्डी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सांगितले. उपोषणाची प्रशासनाने अद्यापपर्यंत दखल घेतली नाही. शिवाय वैद्यकीय पथक देखील तपासणीसाठी आले नाही याबद्दल उपोषणकर्ते ऍड. हरिहर गर्जे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गावागावात लोक स्वतःहून व्यवसाय व व्यवहार बंद ठेवून या उपोषणाला पाठिंबा देत आहेत असे राजाभाऊ दौंड यांनी सांगितले. पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरुवारी (8 डिसेंबर) ला बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे सकाळपासूनच तेथील बहुतांशी व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून आले.