मुंबई – अजित पवार आणि समर्थक आमदारांनी आज पुन्हा एकदा शरद पवार यांची अचानक भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले. पण शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे. अजित पवार आणि समर्थक आमदार शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी आज पुन्हा वायबी चव्हाण सेंटर येथे गेले होते.
अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, अतुल बेनके, अमोल मिटकरी, सुनील टिंगरे, सुनील शेळके, दत्तात्रय भरणे, संजय शिंदे, अण्णा बनसोडे, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, सरोज अहिरे, राजु कारेमोरे या नेत्यांनी शरद पवार यांची आज वायबी सेंटर येथे जाऊन पुन्हा भेट घेतली.
यावर भाजपसोबत जायचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. लोक येऊन भेटले तरी भूमिकेत बदल होणार नाही, अशी भूमिका त्यांनी अजित पवार गटाकडे मांडल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार आणि समर्थक आमदार सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर ते दुसऱ्यांदा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी शरद पवार यांनी कोणताही प्रतिक्रिया दिली नाही.
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. राष्ट्रवादी एकत्रच ठेवण्याचा प्रस्ताव दिला. पण त्यांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या मनात काय सुरु आहे, हे माहित नाही, असे प्रफुल पटेल म्हणाले. दरम्यान, अजित पवार गटाकडून शरद पवारांना साकडे घालणे सुरू आहे. यामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.