नगर,(प्रतिनिधी) – गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत काहींनी कार, तर काहींनी दुचाकी घेतल्या, तर घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याचाही मुहूर्त अनेकांनी साधला. सकाळी गुढीची मनोभावे पूजा, दुपारी गोडपदार्थांच्या जेवणावर ताव अन् सायंकाळी खरेदीचा आनंद लुटून नगरकरांनी गुढीपाडवा उत्साहात साजरा केला.
वाहनांबरोबरच मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. चारचाकी आणि दुचाकी वाहन खरेदीसाठी तर नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोरूमसमोर ग्राहकांची तोबा गर्दी पहायला मिळाली. वाहन खरेदीने गुढीपाडव्याच्या उत्सवात अनेकांनी गोडवा भरला.
गुढीपाडवा हा सण नगर शहरासह सावेडी, केडगाव, भिंगार या उपनगरांमध्ये पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. घरासमोर रांगोळ्या काढून आणि गुढ्या उभारून नागरिकांनी गुढीपाडव्यापासून सुरू होणार्या नववर्षाचे स्वागत केले. घरोघरी गुढीपाडव्याची चांगली तयारी दिसत होती. सकाळच्या वेळेस दारासमोर गुढी उभारून पूजा करण्यात आली.
शहरातील विविध शोरूमवर गुढीपाडव्याच्या दिवशी लगबग पाहायला मिळाली. अनेक जण मनोभावे आपल्या वाहनाची पूजा करून वाहन घरी नेताना दिसले. नवीन खरेदी केलेल्या वाहनासोबतचा फोटोसुद्धा अनेकांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर टाकल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला खरेदी करण्याचीही रीत असल्याने शहरातील दुकानांत गर्दी दिसून येत होती. दुचाकी, चारचाकी वाहने, तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त अनेकांनी साधला. त्यामुळे रविवारी शहर व उपनगरातील वाहनांची शोरूम, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने गर्दीने फुलून गेली होती. सणानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या खरेदीवर विविध सवलती देण्यात आल्या होत्या. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सोने खरेदीचा उत्साह
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सोने सत्तरीपार असले तरी खरेदीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सोने खरेदी करणार्यांमध्ये ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्याही लक्षणीय होती.
सोने सत्तरीपार गेले असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांमध्ये दागिने खरेदीचा उत्साह जास्त आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नेकलेस, मंगळसूत्र, बांगड्या यांना मागणी जास्त होती. तसेच हिर्याचे दागिने खरेदी करण्याकडेसुद्धा ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे.
यंदा चारचाकी वाहनांना मागणी
मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील चारचाकी वाहन खरेदीला शोरुममध्ये गर्दी दिसून आली. गुढी पाडव्याच्या मुहूर्ताचा योग साधत अनेकांनी नवीन चारचाकी गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये चारचाकी वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.