पुणे –एकसदस्यीय प्रभागरचनेनुसार कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्याच्या निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार एक महिन्यात कच्चा आराखडा आयोगाला पाठवण्यात येईल, अशी माहिती महापालिकेतील निवडणूक निर्णय अधिकारी अजित देशमुख यांनी दिली.
दरम्यान, नव्या रचनेनुसार कमी-अधिक संख्या गृहीत धरून महापालिकेत 166 नगरसेवक निवडून येऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.
महापालिका हद्दीतील सुमारे 21,423 मतदारांचा एक प्रभाग या प्रमाणे प्रभागरचना असेल. दरम्यान, 2021 ची जनगणना न झाल्याने 2011 च्या लोकसंख्येच्या आधारावरच या निवडणुका होतील, असेही देशमुख यांनी सांगितले. लोकसंख्येनिहाय महापालिकेकडे प्राथमिक माहिती तयार आहे.
लोकसंख्येच्या आधारानुसार तसेच अनुसूचित जाती जमाती आदी आरक्षण, संवर्गनिहाय ही माहिती आहे. साधारण 22 प्रभागांमध्ये “एससी’ तर दोन प्रभागांमध्ये “एसटी’ संवर्गाची लोकसंख्या अधिक आहे. 50 टक्के मतदारसंघ महिलांसाठी राखीव असतील, असे देशमुख म्हणाले.
नव्या रचनेनुसार एक प्रभाग सुमारे 21,423 (कमी-अधिक दहा टक्के) सर्वात कमी लोकसंख्येचा प्रभागामध्ये 19,281 नागरिक तर सर्वाधिक लोकसंख्येच्या प्रभागात 23,565 नागरिक असतील. सध्या महापालिकेत 162 नगरसेवक आहेत. 11 गावांचा समावेश झाल्यानंतर त्यात दोन नगरसेवकांची भर पडली. तर 23 गावांचा समावेश झाल्यानंतर आणखी दोन नगरसेवकांची भर पडून आगामी निवडणुकीत 166 नगरसेवक होऊ शकतील, असेही मत व्यक्त केले जात आहे.
महिनाभरानंतर आकडे स्पष्ट होणार
सन 2011 च्या लोकसंख्येनुसार शहराची लोकसंख्या 32 लाखांच्या आसपास आहे. 2021 मध्ये जनगणना झाली नाही. दरम्यानच्या काळात महापालिकेच्या हद्दीत गावांचा समावेश झाल्याने आणि मतदार नोंदणीही सुरू असल्याने मतदारसंख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. पण, एक महिन्यानंतर याचे चित्र अधिक स्पष्ट होऊ शकते.