जेजुरी- सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जेजुरीतील मार्तंड देवसंस्थानकडून प्रभावी उपाय योजना राबविण्यात येत आहे. औद्योगिक वसाहतीमधील सुमारे 1 हजार 500 बेरोजगार कुशल, अकुशल परप्रांतीय कामगारांसाठी युनिट नंबर दोनमधून दोन्ही वेळेच्या जेवणाची व्यवस्था गेली 15 दिवसांपासून सुरू केली आहे. याचा ताण देवसंस्थानवर पडत होता. मात्र, आता कारखानदारांनी स्थापन केलेली जिमा संघटना सरसावली असून जिमाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, उद्योजक रवींद्र जोशी, राजेश पाटील, खरेदी- विक्री संघाचे संचालक धनंजय भोईटे आदींनी 2 हजार किलो तांदूळ, 400 किलो तूरडाळ, सुमारे 1 लाख 25 हजारांचा धनादेश मार्तंड देवसंस्थान समितीकडे सोपविला आहे. यावेळी प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने उपस्थित होते.
जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये 1 हजार 500 पर्यंत मराठी आणि परप्रांतीय आहेत. त्यांना गेली 15 दिवसांपासून देवसंस्थानच्या वतीने दोनवेळा अन्नसेवा देण्यात येत आहे. जिमा संघटनेचे पदाधिकारी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, जिमा संघटनेचे सचिव विनायक कुडाळकर,विक्रम फाळके, कार्यकर्त्यांच्या वतीने अन्न वितरणासाठी नियोजन करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांनीही कामगारांसाठी भरीव निधी दिला आहे. किमान 3 मेपर्यंत ही सुविधा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.