तुम्ही देशभरात अनेक जमीनदार पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशा जमीनदारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल. गुजरातमधील मेहसाणा येथील पाचोट गावात एक खास प्रकारचे जमीनदार आहे, ज्यांच्याबद्दल ऐकून तुम्ही थक्क व्हाल ! वास्तविक हे जमीनदार माणसे नसून श्वान आहेत. होय, ऐकायला विचित्र वाटेल पण हे अगदी खरे आहे.
या गावात सध्या श्वान करोडपती आहेत. जर तुम्ही विचार करत असाल की हे श्वान करोडपती कसे बनू शकतात? तर वास्तविक हे श्वान गावातील ट्रस्टच्या नावावर असलेल्या जमिनीतून करोडोंची कमाई करतात. खरे तर गेल्या दशकभरापासून या गावातील जमिनीचे भाव गगनाला भिडू लागल्याने मेहसाणा बायपासच्या बांधकामाचा सर्वाधिक फायदा गावातील श्वानांना झाला आहे. ‘मध नी पती कुतरिया ट्रस्ट’ची गावात 21 बिघा म्हणजे साडेअकरा एकर जमीन आहे. विशेष म्हणजे या जमिनीचे उत्पन्न श्वानांच्या नावावर दिले जाते.
या जमिनीच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर बायपासपासून जवळ असल्याने त्याची किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये प्रति बिघा आहे. त्याचबरोबर या ट्रस्टमध्ये जवळपास 70 श्वान आहेत. यातील प्रत्येक श्वानांच्या वाट्याला सुमारे एक कोटी रुपये येतात.
ट्रस्टचे अध्यक्ष छगनभाई पटेल यांच्या म्हणण्यानुसार, ट्रस्टचा वाटा श्वानांमध्ये वाटण्याच्या परंपरेचे मूळ गावातील जुन्या ‘जीवदया’ प्रथेपासून आहे, जी आजपर्यंत चालत आलेली आहे. खरं तर, ही परंपरा श्रीमंत कुटुंबांनी दान केलेल्या जमिनीच्या छोट्या तुकड्यांपासून सुरू केली होती. मात्र, त्यावेळी जमिनीची किंमत इतकी जास्त नव्हती.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अनेक प्रकरणांमध्ये लोकांनी कर न भरू शकल्यामुळे जमिनी दान केल्या आहेत. या जमिनीची देखभाल पटेल शेतकऱ्यांच्या गटाने सुमारे 70-80 वर्षांपूर्वी सुरू केली होती, जी आजतागायत सुरू आहे. सुमारे 70 वर्षांपूर्वी ही जमीन ट्रस्टकडे आली.
असे म्हणतात की, जसजसे गाव विकसित होत गेले तसतसे जमिनीचे भाव वाढू लागले. अशा परिस्थितीत लोकांनी जमिनी दान करणेही बंद केले. या दान केलेल्या जमिनींमधून मिळणारी रक्कम गावातील श्वान आणि इतर प्राण्यांची काळजी घेण्यासाठी वापरली जाते.