इस्लामपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत सुधीर सुरेश मिरासदार (वय २७ रा. शिराळा) हा युवक जागीच ठार झाला. मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शिराळा-इस्लामपूर रस्त्यावर पेठ हद्दीत हा अपघात घडला. अपघातानंतर अज्ञात वाहन निघून गेले.
याबाबत माहिती अशी की, इस्लामपूर- शिराळा मार्गाने माळी मळा रस्त्यावरून सुधीर मिरासदार हा युवक रात्री उशिरा दुचाकी क्र.( एम एच १० एयु ६५२१) वरून इस्लामपूर कडे येत होता. यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत तो जागीच ठार झाला. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सुधीर बराचवेळ रस्त्यावर मृत होऊन पडून होता. अपघातानंतर इस्लामपूर पोलिसांना याबाबत खबर मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. सुधीर याची ओळख पटल्यावर त्याच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली गेली. पहाटे नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.
सुधीर हा एकुलता एक मुलगा होता. एक वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. पदवीधर असणारा सुधीर नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी इस्लामपूर शहरातील काही बाझारांमध्ये व्यवस्थापन करण्यासाठी येत असे. त्याच्या अपघाती मृत्यूने मिरासदार कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्याचे वडील सुरेश मिरासदार हे निवृत्त फॉरेस्ट ऑफिसर आहेत. त्यांनी अपघाताची फिर्याद इस्लामपूर पोलिस ठाण्यामध्ये दिली. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.