नवी दिल्ली : स्पेसएक्स स्टारशिप कॅप्सूल उड्डाणानंतरच्या तीन मिनिटात रॉकेट बूस्टरपासून वेगळं होणार होतं. मात्र असे न घडता फक्त चार मिनिटात या रॉकेटचा स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ पाहण्यास मिळाले. स्पेसक्स SpaceX हे जगातले सर्वात शक्तिशाली रॉकेट उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटात फुटले आहे. ट्विटरवर यासंदर्भातले व्हिडीओ व्हायरल होत आहेत. स्टारशिप रॉकेटच्या मदतीनेच एक दिवस माणूस मंगळावर स्वारी करेल असे म्हटले जात होते. मात्र एलॉन मस्क यांनी लाँचिंगच्या दरम्यान स्टारशिपमध्ये स्फोट होण्याची शक्यता ५० टक्के असल्याचे म्हटले होते आणि तसेच घडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टारशिप हे एक रियुजेबल रॉकेट होते. या रॉकेटचे दोन भाग होते. पहिला पॅसेंजर भाग ज्या भागात प्रवासी असणार होते. तर दुसरा भाग होता तो म्हणजे हेवी रॉकेट बूस्टरचा. या पूर्ण रॉकेटची उंची १२० मीटर अर्थात सुमारे ३९४ फूट एवढी होती. तर वजन ५० लाख किलोग्रॅम होते. याच रॉकेटचा स्फोट झाला आहे.
Liftoff of Starship! pic.twitter.com/4t8mRP37Gp
— SpaceX (@SpaceX) April 20, 2023
माणसाला चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी SpaceX Starship हे अत्यंत उपयुक्त ठरेल असे मानले जात होते. मात्र लाँचिंगनंतर अवघ्या चार मिनिटात हे रॉकेट फुटले आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता स्पेसएक्स रॉकेट टेक्सासच्या बोकाचिका प्रायव्हेट स्पेसबेसहून लाँच करण्यात आले. मात्र उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटात या रॉकेटचा स्फोट झाला. एलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी असलेल्या SpaceX ने हे म्हटलं आहे की हे रॉकेट फुटले असले तरी त्याचे लाँचिंग झाले हेच आम्ही मोठं यश मानतो.
स्पेसएक्स कंपनीने हेदेखील म्हटले आहे की आज आम्ही अपयशी ठरलो असलो तरीही येत्या काळात आम्हाला यश मिळेल. आज आम्हाला जो अनुभव आला त्यातून आम्ही अनेक गोष्टी शिकलो आहोत. स्टारशिपची विश्वासर्हता वाढेल यासाठी आम्ही त्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत.