जुन्नर येथे वर्षभरात काम पूर्ण होणार
राजुरी – छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नर येथे उभारण्यात येणार असल्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी चाळकवाडी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
सोनवणे म्हणाले महाराष्ट्रात जुन्नर हा पर्यटन तालुका आहे. या तालुक्यात अनेक पर्यटक येतात. किल्ले शिवनेरी ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे त्यामुळे किल्ले शिवनेरीच्या जवळच मी स्वखर्चात एका वर्षात हा पुतळा उभा करून त्याचे लोकार्पण करणार आहे. तसेच पुतळ्याची उंची व जागा निश्चित केलेली असून त्याबद्दलची सविस्तर माहिती येत्या दि. 29 सप्टेंबर रोजी देण्यात येईल, तसेच पुढील तीन महत्त्वपूर्ण घोषणा देखील त्यावेळी करणार आहे.
या पुतळ्याची नोंद सगळ्या जगाला घ्यावी लागणार आहे. याबद्दलची माहिती भीमाशंकर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितली आहे त्यांनी त्याबद्दल सकारात्मक भूमिका दाखविली आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,खासदार श्रीकांत शिंदे, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना देखील याबद्दलची माहिती दिलेली आहे. सोनवणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे त्यासाठी काम करत राहणार महाराजांचे अनेक ठिकाणी पुतळे आहेत पण त्याची उंची 10 ते 15 फुटांपर्यंत असते. मला आपला माणूस ही ओळख मला जनतेने दिली आहे त्यामुळे मी आयुष्यभर जनतेची सेवा करत राहणार, असल्याचे त्यांनी सांगितले.