जागतिक महासत्ता असलेल्या अमिरेकाला इंग्रजांनी सुरू केलेल्या परंपरांचा तीटकारा आहे, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. मात्र, आता याच देशात इंग्रजांनीच जन्माला घातलेल्या क्रिकेटचे वारेही वाहू लागले आहेत. येत्या काळातही त्यात वाढ होणार असून आयपीएलच्या धर्तीवर अमेरिकेतही टी-20 लीग रंगणार आहे.
तसे पाहायला गेले तर अमेरिकेत क्रिकेटचा पाया जवळपास पाच दशाकांपूर्वीच घातला गेला होता. मात्र, ते क्रिकेट म्हणजे थट्टेचा विषय ठरले होते. तिथे बेसबॉल व बास्केटबॉलची परंपरा व लोकप्रियता प्रचंड आहे, त्यामुळे क्रिकेटचे सामने पाहायलाही कोणी फिरकत नव्हते. 1980 च्या दशकापासून मात्र, चित्र बदलले. तिथे आशियाई वंशाचे विशेषतः भारतीय लोक स्थायिक होऊ लागले व क्रिकेटला सुगीचे दिवस येणार हे देखील स्पष्ट झाले. 2000 सालापासून आयटीचे युग अवतरले व आता तर अशी परिस्थिती आहे की मूळ अमेरिकन नागरिकही क्रिकेटला पाठिंबा द्यायला मैदानावर गर्दी करतात. अर्थात, पूर्वी ही गर्दी असायची आता दर्दी असते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व शेन वॉर्न यांनी माजी क्रिकेटपटूंना एकत्र आणून मर्यादित षट्कांच्या सामन्यांची लीग खेळवली होती. न्यूयॉर्कमध्ये बेसबॉल मैदानाचे रूपांतर क्रिकेटच्या मैदानात करण्यात आले व त्याला मिळालेला पाठिंबा पाहता खुद्द आयसीसीचेही डोळे विस्फारले गेले. हे सामने पाहताना आपण अमेरिकेत आहोत यावर विश्वासच बसत नव्हता. न्यूयॉर्कच्या या मैदानावर झालेल्या सामन्यांना सरासरी 30 ते 35 हजार प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. स्टॅण्डमध्ये बसलेले प्रेक्षक या माजी क्रिकेटपटूंचा सामना पाहतानाही तिरंगा फडकावत होते. या खेळाचा जन्म जरी इंग्रजांच्या देशात झाला असला तरीही त्यावर वर्चस्व मात्र, आता भारताचे आहे. जागतिक क्रिकेट म्हणजे भारत हेच समीकरण आहे, हे कोणीच नाकारणार नाही. आज अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 5 ते 7 टक्के नागरिक भारतीय आहेत. किंबहुना भारतीय वंशाचे आहेत. त्यामुळे तिथेही क्रिकेटला चांगली लोकप्रियता मिळत आहे.
अमेरिका क्रिकेट संघटना 1965 साली उदयाला आली व आयसीसीनेही त्यांना सहयोगी सदस्य म्हणून मान्यता दिली. त्यानंतर प्राथमिक अवस्थेत असलेल्या त्या संघटनेत वाद घडले, काही प्रकरणेही घडली व आयसीसीने त्यांची मान्यता 2017 साली स्थगित केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांच्या संघटनेवरील निर्बंध मागे घेतले गेले व खऱ्याअर्थाने त्यांच्या क्रिकेटलाही समाजमान्यता मिळाली. 2004 साली आयसीसीच्या युनायटेड नेशन्स करंडक स्पर्धेत या संघाने नेत्रदीपक कामगिरी केली व विजेतेपदही प्राप्त केले. तेव्हापासूनच त्यांच्या क्रिकेटमध्येही व्यावसायिकता येऊ लागली व आज त्यांचा संघ प्रगती पथावर असून लवकरच त्यांच्या क्रिकेटकडेही गांभीर्याने पाहिले जाईल. या विजेतेपदामुळे त्यांचा संघ 2004 सालच्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठीही पात्र ठरला होता. त्यांना याच सालापासून आयसीसीने एकदिवसीय सामन्यांचा दर्जा दिला. आजवर त्यांनी 15 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 6 विजय तर, 9 पराभव अशी कामगिरी केली आहे. तसेच त्यांना टी-20 सामन्यांचाही दर्जा मिळाला असून त्यात त्यांनी अद्याप केवळ 8 सामने खेळले आहेत. त्यात 2 सामने जिंकले असून 5 पराभव पत्करले आहेत. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. कसोटी दर्जा त्यांच्यासाठी एक स्वप्नच ठरणार असून त्यासाठी त्यांना आयसीसीच्या तीन व चार दिवसांच्या सामन्यांच्या स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी करावी लागणार आहे. 2010 साली ते टी-20 सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतही पात्र ठरले होते. त्यांची कामगिरी दिवसेंदिवस प्रगतीपथावर होत आहे. यातूनच त्यांच्याकडे क्रिकेट चांगलेच रूजत असल्याचेच हे द्योतक आहे. 1979 सालापासून त्यांच्या संघाचे नेतृत्व अनिल काशकारी यांनी केले होते. ते अमेरिका संघाचे पहिले कर्णधार होते. आता त्यांचा संघ भारतीय वंशाच्याच सौरभ नेत्रावळकर यांच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. गेली दोन वर्षे त्यांनी आपल्या कामगिरीत राखलेले सातत्यच त्यांना आयसीसीचा पूर्ण सदस्यपद मिळवून देईल असा विश्वास वाटतो. येत्या काळात इंग्रजांचा द्वेष करणारा हा देश त्यांच्याच खेळात प्रावीण्यही मिळवेल, हीच अपेक्षा आहे.
आयपीएलच्या धर्तीवर रंगणार स्पर्धा
यूएस मेजर लीग ही स्पर्धा आता तेथे रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर ही स्पर्धा होत असून अमेरिकेत टी-20 सामन्यांची ही पहिलीच स्पर्धा ठरणार आहे. भारतातील प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाची मालकी असलेल्या कंपनीनेच अमेरिकेतील टी-20 लीगमधील लॉस एंजलीस संघाची मालकी मिळवली आहे. आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या संघासह शाहरूखने वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील ट्रिनबागो नाइट रायडर्स संघ विकत घेतल्यानंतर आता लॉस एंजलीस संघही विकत घेतला आहे. या संघाचे नामकरणही त्याने एलए नाइट रायडर्स असे केले आहे. या स्पर्धेत सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी, शिकागो, डलास, न्यूयॉर्क आणि लॉस एंजलीस असे सहा संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा अमेरिकन क्रिकेट एटरप्रायझेस या कंपनीने आयोजित करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याचे सहसंस्थापक विजय श्रीनिवासन हे भारतीय वंशाचेच गृहस्थ आहेत. अमेरिकेतील मार्केटही भारताप्रमाणेच वाढत आहे. त्यातच क्रिकेटची वाढती लोकप्रियता पाहता ही स्पर्धा येत्या काळात खूप प्रसिद्ध होईल असा विश्वास खुद्द आयसीसीनेही व्यक्त केला आहे. मल्टी मिलियन डॉलर टी-20 लीग अशा नावाने ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच ओळखली जाऊ लागली आहे. ही स्पर्धा पात्रता फेरीनुसार पुढील वर्षी जुलै महिन्यात सुरू होईल. मुख्य स्पर्धा जवळपास दीड महिना चालेल. या स्पर्धेतील बहुतांशी सामने शनिवार व रविवार या दोन दिवशी खेळवण्यात येणार आहेत. अमेरिकेतील क्रिकेटला जागतिक मान्यता व ओळख मिळवण्यात ही स्पर्धा मोठा वाटा उचलेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.