लोणी धामणी – धामणी (ता. आंबेगाव) येथे ग्रामपंचायतीच्या साहाय्याने रेशनिंग वाटप करण्यात येत आहे. याची सुरुवात आज (दि. 4) बढेकर वस्तीपासून करण्यात आली. हे रेशनिंगचे धान्य वाटप खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून केले जात असून, एरवी रेशनिंगच्या दुकानात रांगा लावून गर्दी करणाऱ्यांना घरोघरी जाऊन रेशनिंग वाटप करण्यात येत आहे.
करोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी गावात गेले काही दिवस सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम तंतोतत पाळले जात आहे; परंतु रेशनिंग जर दूकानात जाऊन घ्यायचे तर त्या ठिकाणी गर्दी होईल. म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर जाऊन धान्य वाटपाचा निर्णय घेतला. गावातील सातशे रेशनिंग धारक आणि अठरा वाडी,वस्त्यांना त्यांच्या घरापर्यंत रेशनिंग वाटण्याचा निर्णय घेतला त्या बद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या कामाचे मोठे कौतुक केले, अशी माहिती सरपंच सागर जाधव यांनी दिली आहे.