हडपसर- काळेपडळ सेलेनापार्क जवळील पालिकेच्या २५ लाख लिटर पाण्याची टाकी व रामटेकडी ते या पाण्याच्या टाकी पर्यंतच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाला गती देण्यात यावी.
तसेच टाकीचे काम पूर्ण करून पुढील महिन्यात याभागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात देण्यात यावे,अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका आणि लष्कर पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना केली आहे.
सेलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीच्या कामाचे भूमिपूजन ऑगस्ट 2015 ला झाले आहे.मात्र अद्यापही काम पूर्ण नाही . त्यामुळे रखडलेल्या या कामाला गती देण्यात यावी यासाठी नगरसेवक नाना भानगिरे यांनी संबधीत विभागांना भेटून काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
काळेपडळ ,हांडेवाडी रोड परिसर या भागात पाण्याची समस्या गंभीर असून गेली काही दिवसांपासून नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. वेळी अवेळी पाणी मिळत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
तेव्हा सेलेना पार्क येथील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच पाण्याच्या लाईनही पूर्ण कराव्यात आणि पुढील दोन महिन्यांत याभागाला सुरळीत पाणी पुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेवक नाना भानगिरे यांनी महापालिका व पाणी पुरवठा विभागाला दिला आहे.
दरम्यान प्रभागात पावसाळ्यात ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्याच्या ठिकाणांची पाहणी करून याठिकाणी पावसाळी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम लवकरच सुरू करण्यात यावे,अशी मागणीही त्यांनी केली आहे.