पिंपरी -केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बोगस ना-हरकत प्रमाणपत्राद्वारे शाळा सुरू करून शेकडो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या काही संस्थांची प्रकरणे उजेडात आली आहेत. त्यानंतर शहरातील सर्वच सीबीएसई बोर्डाच्या शिक्षण संस्थांना मुख्य प्रवेशद्वारावर ना-हरकत प्रमाणपत्राचे जाहीर प्रकटन करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. तर प्रशासनाकडून तब्बल 41 शाळांना तंबी दिली आहे.
पुण्यातील एमपी इंटरनॅशनल स्कूल ऍण्ड जुनिअर कॉलेज, एज्युकेशन करिअर फाऊंडेशनच्या नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल ऍण्ड जुनिअर कॉलेज आणि पिंपरी-चिंचवडमधील क्रिएटिव्ह एज्युकेशनल सोसायटी संचलित पब्लिक स्कूल ऍण्ड जुनिअर कॉलेज या शिक्षण संस्थाकडे सीबीएसई बोर्डाचे बोगस ना-हरकत प्रमाणपत्र असल्याचे उजेडात आले आहे. या शाळांमधून शेकडो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमिवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने सतर्कता बाळगून शाळांची कागदपत्र तपासणी प्रक्रिया हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय पातळीवर त्याची कार्यवाही देखील सुरु करण्यात अ ाली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सीबीएसई बोर्डाच्या एकूण 41 शिक्षण संस्था कार्यरत आहेत. तीन शिक्षण संस्थांच्या बोगस ना-हरकत प्रमाणपत्रांचे प्रकरण समोर आल्यानंतर जागे झालेल्या शिक्षण विभागाने या सर्वच शाळांच्या ना-हरकत प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. या सर्वच शाळांना त्यांची सीबीएसई बोर्डाच्या प्रमाणपत्रासह इतर शासकीय कागदपत्रे सादर करण्याचे आदेश शिक्षण प्रशासनाने दिले आहेत. तसेच, विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी सर्वच शाळांनी त्यांचे सीबीएसई बोर्डाचे ना-हरकत प्रमाणपत्र शाळेच्या प्रवेशद्वारावर जाहीरपणे लावण्याचे आदेश दिले आहेत.
बोगस एनओसी प्रकरण
शिक्षण संस्थेची सर्व कागदपत्रे त्वरीत
सादर करा
एनओसी शाळेच्या प्रवेशद्वारावर लावणे बंधनकारक
बनावट ना-हरकत प्रमाणपत्राद्वारे शाळा चालवल्या जात असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वच शाळांचे प्रमाणपत्र व तत्सम प्राधिकृत कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याची छाननी करण्यासाठी फाईल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. अशा बोगस शाळांवर राज्य शासनाच्या आदेशानंतर कारवाई होणार आहे.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग