मुंबई – अमेरिकेच्या रिझर्व्ह बॅंकेचे अध्यक्ष जेरोम पावेल यांनी मंदी आली तरी चालेल मात्र महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात वाढ केली जाईल असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजाराचे (Stock Market) निर्देशांक अपेक्षेप्रमाणे घसरले. या घडामोडीचा सोमवारी भारतीय शेअर बाजाराबरोबर जगातील इतर शेअर बाजारावर काही प्रमाणात नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता विश्लेषकांनी सुचित केली आहे.
किंबहुना अमेरिकेच्या या पतधोरणाचा गुंतवणूकदारांना अंदाज आल्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये शेअर बाजारामध्ये खरेदी पेक्षा विक्री जास्त होण्याचे वातावरण होते. त्या अगोदर सहा आठवडे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. अमेरिकेच्या या पतधोरणाचा परदेशी संस्थागत गुंतवणूकदार काय अर्थ घेतात आणि काय निर्णय घेतात यावरही बरेच अवलंबून आहे.
गेल्या एक महिन्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी चालू ठेवली होती. मात्र आता पुन्हा या गुंतवणूकदारांनी जर विक्री केली तर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक पुन्हा काही काळ कमी पातळीवर राहू शकतात. भारताची स्थूल अर्थव्यवस्था मजबूत आहे. मात्र भारतीय शेअर बाजारावर परदेशी घडामोडीचा परिणाम होत असतो.
31 ऑगस्ट रोजी भारतातील पहिल्या तिमाहीच्या विकास दराची आकडेवारी जाहीर होणार आहे. ती सकारात्मक असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 1 सप्टेंबर रोजी भारतातील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर होणार आहे. अमेरिकेच्या पतधोरणानंतर डॉलर वधारतो का, अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढतो का, त्याचबरोबर कच्च्या तेलाचे दर वाढतील का या विषयाकडे भारतातील गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.
पुढील आठवड्यामध्ये भारतातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा परचेसिंग मॅनेजर इंडेक्स जाहीर होणार आहे. त्याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असणे अपेक्षित आहे. अमेरिकेतील रोजगार आणि महागाईच्या आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. त्या आकडेवारीचा अमेरिकेच्या पतधोरणावर परिणाम होणार आहे.
त्यामुळे काही गुंतवणूकदार अमेरिकेतील या आकडेवारीकडे लक्ष देण्याची शक्यता आहे. मात्र काही गुंतवणूकदारांनी आणि विश्लेषकांनी सांगितले की अमेरिकेच्या या पतधोरणाचा अंदाज अगोदरच गुंतवणूकदारांना आलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी त्या अगोदरच या संदर्भातील आवश्यक ते निर्णय घेतले आहेत. (The US interest rate hike may have an impact on the stock market)