वॉशिंग्टन – अमेरिकेच्या नव्या बायडेन प्रशासनाने चीनच्या विरोधातील आपली मोर्चे बांधणी आता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न चालवला असून नुकतीच झालेली क्वाड संघटनेची बैठक हा याच प्रक्रियेतील भाग होता असे अमेरिकन प्रशासनातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
सध्या अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध अगदी नाजुक पातळीवर गेले आहेत. विविध मुद्द्यांवर त्यांचा सध्या जोरदार संघर्ष सुरू आहे. दक्षिण चीन समुद्रात चीन आपली ताकद आणि हस्तक्षेप वाढवत आहे. त्याचीही गंभीर दखल अमेरिकेने घेतली आहे. हॉंगकॉंग आणि शिजींयांग प्रांतात त्यांनी मानवाधिकारावर मोठे आक्रमण चालवले आहे. तसेच व्यापारी क्षेत्रातही चीनची आक्रमक हालचाल सुरू आहे. या सगळ्याला पायबंद घालण्यासाठी अमेरिका नव्याने पुढे सरसावते आहे. यासाठी त्यांनी आपल्या भागीदार देशांना तसेच मित्र देशांना बरोबर घेण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी युरोपिय देशांशीही चर्चा सुरू आहे. चीनच्या एकूणच आक्रमक भूमिकेवर आंतरराष्ट्रीय समुदायातून मोठी आघाडी उघडली गेली पाहिजे यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे.