वॉशिंग्टन – अमेरिकेकडे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्रास्त्रे आहेत, असा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तथापि, ही शस्त्रास्त्रे वापरण्याची वेळ आमच्यावर कधीही येऊ नये, अशी कामनाही त्यांनी केली आहे. गेली अनेक वर्षे विदेशी भूमीवर युद्धे लढण्याची हास्यास्पद आणि मूर्खपर्णाची वेळ अमेरिकेवर आणली गेली, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
पेनसीलव्हेनिया येथील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. अमेरिकन नागरिकांना आणि अमेरिकन हिताला बांधा पोहोचवणाऱ्या दहशतवाद्यांचा आम्ही जगाच्या पाठीवर कोठेही जाऊन खात्मा करू; पण आता यापुढे आम्ही विदेशी भूमीवर जाऊन नाहक अन्य देशांसाठी युद्धे लढणार नाही आणि नाहक खर्च करणार नाही, अशी नवी भूमिकाही त्यांनी मांडली.
ते म्हणाले की अमेरिकेने अलीकडच्या काळात अत्यंत शक्तिशाली शस्त्रे बनवली आहेत. जगातील काही देशांना याची कल्पना आहे. त्यांना याची कल्पना आहे हे अधिक चांगले झाले. तथापि ही शस्त्रे वापरण्याची वेळ आमच्यावर येऊ नये अशी मी देवापुढे प्रार्थना करतो, असे ट्रम्प यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, आम्ही तब्बल अडीच ट्रिलियन डॉलर्सची रक्कम खर्च करून उत्तम लष्करी यंत्रणा उभारली आहे. अनेक महत्त्वाची लष्करी यंत्रणा, विमाने, रॉकेट्स, क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रे आम्ही बनवली आहेत. आपण सत्तेवर यायच्या आधी ही सारी प्रक्रिया थांबली होती असा दावाही त्यांनी केला.