पिंपरी – सकाळपासून शहरावर धुक्याची चादर पसरलेली असतानाच मंगळवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पारा घसरल्याने वातावरणात गारठा जाणवत होता. दिवसभर हीच परिस्थिती राहिल्याने पिंपरी-चिंचवडकर गारठले होते.
वातावरणातील बदलामुळे हवामान विभागाने मंगळवारी (दि.9) मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार सकाळपासूनच शहरावर धुक्याची चादर पसरली होती. सकाळी अकराच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली. त्यानंतर दोन तासांच्या विश्रांतीनंतर जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. हवामान विभागाच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करून बाहेर पडलेले अनेक नागरिक पावसात सापडले. पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उड्डाणपूल, बसथांबे, हॉटेल्स व अन्य ठिकाणांचा आसरा घेतला.
पावसात भिजल्याने गारठ्याची तीव्रता आणखी वाढली. तर दोन दिवसांपूर्वीदेखील पावसाने शहरात रात्री हजेरी लावली होती. दरम्यान, दुपारनंतर पावसाने मावळ तालुक्यातदेखील हजेरी लावल्याने पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. ऐन हिवाळ्यात पावसाच्या जोरदार हजेरीने समाजमाध्यमांवर पावसाच्या फोटोंसह हिवसाळ्याचे मिम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. थंडी काहीशी कमी झाली आहे. सोमवारी सायंकाळी काही प्रमाणात आभाळ भरून आले होते. मात्र, पाऊस आला नाही. सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. मंगळवारी सकाळी चिंचवड परिसरामध्ये हलक्याशा सरीवर बरसल्या. त्यानंतर काही काळ पावसाने उघडीप दिली. पुन्हा दुपारी साडेबारा नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, चिंचवड, पिंपरी, निगडी, थेरगाव, किवले, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, सांगवी,नवी सांगवी, दापोडी, वाल्हेकर वाडी आकुर्डी या परिसरात दुपारी साडेबारा वाजल्यापासून पाऊस होता.
वातावरणात गारठा
पावसाचा जोर कमी असला तरी वातावरणामध्ये गारठा जाणवत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे दुपारच्या वेळेस सुटणाऱ्या शाळकरी मुलांची गैरसोय झाली. अचानक आलेल्या पावसामुळे कामाला जाणाऱ्या तसेच कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांची गैरसाय झाली.