काबुल – अफगाणिस्तानमधील अमेरिकेचे उर्वरित सैन्य या वर्षी सप्टेंबरपूर्वी माघारी जाणार आहे. त्यानंतर अमेरिकेच्या सैन्याची शस्त्रास्त्रे तालिबान्यांच्या हातात पडण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्याची हजारो वाहने, शस्त्रे आणि इतर लष्करी वस्तू तालिबानकडून ताब्यात घेतली जाण्याचा धोका आहे, असे गुरुवारी अफगाणिस्तान संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. मात्र हा संभाव्य धोका कमीत कमी राखूनच सैन्य माघारीची प्रक्रिया केली जात असल्याचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जर तशी वेळ आलीच तर तालिबान्यांविरोधातील संघर्ष सुरूच ठेवण्यासाठी आपली युद्धसामुग्री अफगाण सुरक्षा दलांच्या हाती सोपवली जाईल, असे जॉइंट स्टाफच्या पॉलिटिको-मिलिटरी अफेयर्सचे डेप्युटी डायरेक्टर जॉईंट मॅथ्यू ट्रोलिंजर यांनी अफगाणिस्तानबाबतच्या चर्चेदरम्यान सिनेट सदस्यांना सांगितले.
जास्तीत जास्त युद्धसामुग्री अमेरिकेत परत नेली जाईल. ही सामुग्री खंडात अन्यत्र असलेल्या अमेरिकेच्या तळांवर हलवली जाईल अथवा ज्या शस्त्रांचे अफगाणिस्तानला कायदेशीर हस्तांतरण करता येऊ शकणार नाही अशी शस्त्रे नष्ट केली जातील. मात्र कोणतीही शस्त्रे बेवारस राहू दिली जाणार नाहीत आणि शत्रूच्या हातात पडली जाऊ दिली जाणार नाही, असे ट्रोलिंजर म्हणाले.
अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर अफगाणिस्तानमधील सुरक्षिततेबाबत सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीतील अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावेळच्या चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. इराकमधून अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तेथील युद्धसामुग्री इसामिक स्टेटच्या हातात पडली होती. त्याचीच पुनरावृत्ती अफगाणिस्तानमध्ये होण्याची भीती काही सिनेट सदस्यांनी व्यक्त केली होती.
अमेरिकेच्या युद्धसामुग्रीची माघारीची प्रक्रिया 13 ते 20 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली असल्याचे या आठवड्याच्या प्रारंभी सांगण्यात आले. मात्र किती सैनिक आणि शस्त्रे माघारी पाठवले गेले याचा तपशील दिला गेला नाही.
अमेरिकेच्या सैन्य अधिकाऱ्यांकडून जरी काळजी घेतली जात असली तरी अफगाणिस्तानमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर असल्याने चालू स्थितीतील कोणतीही युद्धसामुग्री मागे राहू न देणे हे मोठे आव्हान आहे. 2014 पर्यंत अफगाणिस्तानात सुमारे 10,000 अमेरिकन सैन्य तैनात होते, अमेरिकन सैन्य दलांनी अफगाणिस्तानमध्ये सुमारे 36 अब्ज डॉलर्स किमतीची युद्धसामुग्री नेली होती. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मे महिन्यात सैन्याच्या पूर्ण माघारीची योजना जाहीर केली, अफगाणिस्तानात अमेरिकेचे सुमारे 2,500 सैन्य तैनात होते.