पुणे – जगातील सर्वात मोठी लस उत्पादक असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्राच्या लसीकरण मोहिमेवर काहीशी टीका केल्यानंतर सीरमने मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला हेच त्यांचे अधिकृत प्रवक्ते असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अचारसंहितेचा केंद्र सरकारने विचार केला नाही. साठ्याची उपलब्धतता न पाहताच केंद्राने विविध वयोगटांसाठी लसीकरण सुरू केल्याचे जाधव यांनी मुलाखतीत सांगितले होते, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले होते.
सीरम इन्स्टिट्यूटने हे कंपनीचे मत नसल्याचे स्पष्टीकरण तातडीने दिले होते. हे विधान सीरम इन्स्टिट्यूटचे विधान म्हणून गृहीत धरू नये. या विधानापासून कंपनी स्वत:ला दूर ठेवत आहे. कंपनीची ही कोणत्याही बाजूने विचारसरणी नसल्याचे मी आपणास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्या वतीने कळवत आहे, असे पत्र सीरमचे सरकारी परवानगी विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी आरोग्य मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले असल्याचेही या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. याच पत्रात अदर पुनावाला हेच कंपनीचे अधिकृत प्रवक्ते असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोविशिल्डचे उत्पादन सर्वाधिक करण्यासाठी सीरम बांधील आहे. करोनाविरूध्दच्या लढ्यात सरकारच्या खांद्याला खांदा लावून सीरम लढत आहे, असेही या पत्रात नमूद केले आहे.
आपल्याकडे पुरेसा साठा नाही, याची कल्पना असतानाही सरकारने लसीकरण सुरू केले. सुरवातील 30 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी 60 कोटी डोसची आवश्यकता होती. मात्र हे लक्ष्य गाठण्यापुर्वीच प्राधान्य नसलेल्या गटांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले.
त्यात 45 वर्षांवरील व्यक्ती आणि नंतर 18 वर्षांवरील व्यक्तींचा समावेश आहे. हा आपल्याला सर्वात मोठा धडा आहे. आपण उत्पादनाची उपलब्धता आधी विचारात गेतली पाहिजे आणि नंतर त्याचा न्याय्य वापर केला पाहिजे, असेही जाधव म्हणाले होते.