पुणे-मुंबई रस्तेमार्ग अंतर 6 कि.मी ने कमी होणार
पुणे – पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागातील पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याच्या कामास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरुवात करण्यात आली आहे. हा बोगदा सुमारे 10 किलोमीटर लांबीचा असणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत बोगद्याचे कामाने वेग घेतला असून 1,800 फूट इतके खोदकाम झाले आहे. या मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई हे अंतर सहा कि.मी ने कमी होणार असून 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरिडॉर सुधारणा तथा देखभाल, दुरुस्तीसाठी “बांधा, वापरा व हस्तांतरीत करा’ या तत्वावर 30 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी शासनाने 1999 पासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केले आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात.
अडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहा पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. याभागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 कि.मीच्या राहिलेल्या मिसींग लिंकमुळे मुंबईला लवकर पोहचणे शक्य होणार आहे.
या प्रकल्पामुळे बोर घाटातील 6 किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. लोणावळापासून सुरू होणारा हा बोगदा पुढे खोपोली एक्झिट इथे संपणार आहे. मागील दीड महिन्यांपूर्वी या कामास सुरुवात झाली असून पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याची मर्यादा शासनाने घातली आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.