चाकूचा धाक दाखवला : नागरिक भयभीत
सविंदणे – शिरूर तालुक्यातील इचकेवाडीतील गावडेवस्तीत कासुबाई नानाभाऊ गावडे या 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेला पहाटे घराबाहेर येण्याच्या प्रयत्नात असताना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून दागिने व रोख रकमेसह 70 हजार रुपयांचा ऐवज पळविला. ही घटना शनिवारी (दि. 9) पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दागिने व रोख रकमेसह 70 हजार रुपयांचा ऐवज पळविला.
कासुबाई यांचा मुलगा शिवाजी गावडे हे नोकरीनिमित्ताने पुण्यात वास्तव्यास असतात. त्या घरी एकटेच असतात. कासुबाई या पहाटेच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर आल्या होत्या. त्यांनी दरवाजा उघडताच घराबाहेर दबा धरून बसलेल्या 3 चोरट्यांनी त्यांना ढकलून दिले. घरातील लाकडी बेडवर ढकलून गळ्यातील 2 तोळ्याची बोरमाळ, अर्धा तोळ्याचे 2 कर्णफुले ओरबाडून काढले. तत्पूर्वी घरासमोर लावलेला विजेचा दिवा काढून टाकला.
घराच्या कोपऱ्यावर प्लॅस्टिक कॅनवरून घराच्या कौलांवर चढून आत शिरण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. पुढील दरवाजातून आत आलेल्या चोरट्यांनी कासुबाई यांना चाकूचा धाक दाखवत गप्प बसण्यास सांगितले. दरम्यान, चोरट्यांनी कपाट व इतर साहित्यांची उचकापाचक करीत साहित्य अस्ताव्यस्त केले.
कासुबाई यांनी घरात ठेवलेली 2 हजार 700 रुपयांची रक्कम व मोबाइल लांबवला. चोरट्यांनी गावडे यांचे दागिने व रोख रकमेसह 70 हजार रुपयांचा ऐवज पळविला. कासुबाई यांच्या कानातील कर्णफुले चोरट्यांनी ओरबाडल्याने त्यांना कानाला जखम झाली आहे. त्यांना ढकलून दिल्यामुळे त्यांना पाठ, गुडघ्यास देखील मार लागला आहे. घटनेची माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना मिळताच त्यांनी तातडीने पोलीस घटनास्थळी पाठविले.
पोलीस हवालदार एस. बी. रुपनवर यांनी सकाळी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पोलीस पाटील गणेश पवार, राजू शिंदे, नारायण गावडे, महिला, ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.
बिबट्याचा हल्ला अन् चोरट्यांचा डल्ला
बिबट्याने हल्ले केले, चोरट्यांनी लुबाडले, पावसाने बदडले तर शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बेट भागातील नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची, असा संतप्त सवाल नागरिक व्यक्त करीत आहेत. बिबट्याचा धुमाकूळ वाढला आहे. चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. परतीच्या आणि वादळी पावसाने बदडून काढल्यामुळे शेतकरी, नागरिक मेटाकुटीला आले आहे. पोलीस पंचनामा आणि तपासाचे सोपस्कर पार पाडत आहेत.