गाजावाजा केलेली घंटागाडी धूळखात

गावातील कचरा सेवा रस्त्यावर : महामार्गाची कचराकुंडी

पळसदेव- इंदापूर तालुक्‍यात मोट्या गावात गणती होणाऱ्या व राजकीयदृष्ट्या महत्वाचे गाव मानून पळसदेव गावाची ओळख आहे. मात्र, सध्या गावात नागरिक पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावरच व गावातील मोकळ्या जागेवर कचरा टाकत असल्याने गावाभोवती जागोजागी कचरा कुंडी असलेचे चित्र दिसत आहे. नागरिकांना कचरा टाकण्यासाठी जागाच नसल्याने ते इतरत्र कचरा टाकून गावाचे विद्रुपीकरण करीत आहेत.

ग्रामपंचायतीच्या वतीने लाखो रुपये खर्चून घंटागाडी आणली. विधानसभा निवडणुकीअगोदरच घंटागाडीचे वाजतगाजत लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र, तेव्हापासून कचरा गोळा करण्यासाठी घेतलेली गाडी मात्र गायबच झाली असल्याचे नागरिकांचे मत आहे. सध्या घंटागाडी ग्रामपंचायतीमध्ये कायम उभा असल्याचे चित्र दिसत आहे. लाखो रुपये खर्चून घंटागाडी आणली. मात्र, ती वापराविना पडून असल्याने नागरिकांनी संताप व्यक्‍त केला आहे. विशेषत: महिलांना कचरा टाकण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावात केशकर्तनालयाची पाच ते सहा दुकाने आहेत. हे व्यावसायिक केसांचा ढीग महामार्गाच्या सेवा रस्त्यावरच फेकून देत आहे. सेवा रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुभाजकाजवळ कापलेले केस टाकलेले आहेत.

चिकन, मटण विक्रीचा व्यवसाय करणारे कोंबड्यांची पिसे, मासे कापल्यानंतर निघालेली कातडी रस्त्याच्या बाजूलाच फेकून देत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गावात प्रवेश करतानाच याचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागत आहे. गावात दोन बॅंका, चार ते पाच पतसंस्था व सोसायट्या आहेत. या कार्यालयातील कचरा फेकून दिला जात आहे. त्यामुळे गावाचे विद्रुपीकरण होत असताना ग्रामपंचायत प्रशासन निद्रिस्त झाली आहे. ग्राम दैवत श्री पळसनाथ मंदिर व आखाड्याच्या परिसरात काही नागरिक कचरा टाकत आहे. त्यामुळे गावातील भाविकांमध्ये नाराजी व्यक्‍त केली आहे.

ग्रामसेवक भुजबळ म्हणाले की, घंटागाडीला चालक उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. लवकरात लवकर नागरिकांना घंटागाडीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.