वाघोली (प्रतिनिधी) :- वाघोली (तालुका हवेली) येथील श्री क्षेत्र भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पराजयाचा सामना करून बहुचर्चित ठरलेला पैलवान सिकंदर शेख याची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर याच्या सोबत झाली. या कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखने सदगीरला चितपट करत विजय मिळविला. अन् जो जिता वहीं सिकंदर चा अनुभव नागरिकांना आला.
सांस्कृतिक कार्यक्रम व भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे वाघेश्वर केसरी, भैरवनाथ केसरी, वाघोली कुमार केसरी इ. कुस्त्या पार पडल्या. वाघेश्वर केसरी साठी उपमहाराष्ट्र केसरी गणेश जगताप विरुद्ध महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख यांच्यात रंगत झाली. ही कुस्ती बरोबरीत राहिली. तर भैरवनाथ केसरी साठी उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यात रंगत झाली. यामध्ये कोकाटे याने बनकरला चितपट करीत विजय मिळविला.
यासह वाघोलीतील ग्रामस्थांच्यावतीने अनेक मातब्बर निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या पैलवानांना लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. तत्पूर्वी हिंदकेसरी अभिजित कटके याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याशिवाय विशेष पदक प्राप्त झाल्याबद्दल लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कुस्ती स्पर्धेसाठी मैदान खचाखच भरले होते. राजेंद्र सातव परिवार यांच्या वतीने विजेता सिकंदर शेख याला दोन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर भैरवनाथ केसरी स्पर्धेतील विजेता कोकाटे याला माणिकराव सातव यांच्या वतीने 1,51,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. अनेकांनी रोख स्वरूपात पारितोषिक विजेत्या मल्लांना दिले. या कुस्ती वेळी वाघोलीसह परिसरातील आजी माजी लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, राज्यातील नामवंत पहिलवान,प्रशिक्षक उपस्थित होते.
“पारंपरिक आखाड्याला आधुनिकतेची जोड देऊन वैयक्तिक तसेच गाव पातळीवर ग्रामस्थांच्या मदतीने जवळपास 40 लाख रुपयांची बक्षिसे राज्यातील नामवंत पैलवानांना देण्यात आली. गाव पातळीवर पंचांच्या सोबतीला कुस्ती फेडरेशनचे पंच यांच्या मदतीने निर्णयात पारदर्शकता ठेवण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून घर बसल्या कुस्तीचे लाईव्ह प्रक्षेपण नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले होते. राज्य स्तरावरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्याचा अनुभव वाघोली ग्रामस्थांनी घेतला आहे.”
-रामकृष्ण सातव पाटील(माजी उपसरपंच, वाघोली)
कुस्ती स्पर्धा नियोजन, मैदान पूर्वतयारी ते प्रेक्षक गॅलरीपर्यंत उभारणीसाठी अभिजीत कटके, तात्यासाहेब शिंदे, संतोष पायगुडे, सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर, माऊली कटके, माणिकराव सातव पाटील, रामकृष्ण सातव पाटील मित्र परिवार व ग्रामस्थ यांनी योगदान दिले.