सेंच्युरियन – दक्षिण आफ्रिकेत येत्या 18 जुलै रोजी थ्री टीम क्रिकेट लढत रंगणार आहे. हा सामना 27 जूनला होणार होता. मात्र, करोनाचा धोका कायम राहिल्यामुळे हा सामना लांबणीवर टाकला गेला होता. या एकदिवसीय सामन्यात परंपरेप्रमाणे दोन नव्हे तर, तीन संघ एकाच सामन्यात खेळणार आहेत.
येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर येत्या 18 जुलैला तीन संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. या सामन्यात सहभागी होत असलेल्या संघांचे नेतृत्व अनुक्रमे एबी डिव्हिलियर्स, क्वांटन डीकॉक व कागीसो रबाडा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सॉलिडॅरीटी करंडक असे या सामन्याचे नामकरण करण्यात आले आहे.
करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात प्रत्येक संघाला 12 षटके फलंदाजीसाठी देण्यात येतील. जो संघ सर्वाधिक धावा करेल तो विजेता ठरेल. विजेत्या संघाला सुवर्ण, उपविजेत्या संघाला रजत तर, तृतीय क्रमांकाच्या संघाला ब्रॉंझ पदक देण्यात येणार आहे. सामना टाय झाल्यावर सुपर ओव्हरचा अवलंब केला जाणार असून तीनही संघांमध्ये ही लढतही टाय झाली तर तीनही संघांना मिळून संयुक्तपणे सुवर्णपदक देण्यात येणार आहे.