जुलैमध्ये वाहन विक्री वाढणार

सोशल डिस्टन्सिंगमुळे ग्राहकांकडून विचारणा वाढली

मुंबई – सोशल डिस्टन्सिंगमुळे ग्राहक वाहन खरेदी करण्याबाबत अधिक चौकशी करीत असल्याचे वितरकाकडून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे जुलै महिन्यात वाहन विक्री वाढण्याची शक्‍यता असल्याचे एका अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे.

त्यातल्या त्यात छोट्या शहरातून वाहन विक्रीला अधिक चालना मिळेल. कारण त्या ठिकाणी ग्रामीण भागातील ग्राहक असतात. पाऊस चांगला पडणार असल्यामुळे शेतीतील उत्पन्नावर परिणाम होणार नाही. त्यामुळे छोट्या शहरातून वाहन विक्री अधिक वाढेल, असे डोलट कॅपिटल या संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

कारपेक्षा दुचाकींना छोट्या शहरातून मागणी अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. कारण यामध्ये जास्त गुंतवणूक नसते. नंतर मोठ्या शहरातूनही कारला मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. सध्या कर्जावरील व्याजदर कमी आहेत. वाहन कंपन्यांकडे उत्पादन तयार आहे. किंबहुना इन्व्हेंटरी आहे. शक्‍य तितक्‍या लवकर वाहने विकावी त्याकरिता वितरक व कंपन्या डिस्काउंट द्यायला तयार आहेत. याचा अंदाज ग्राहकांना आला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात दुचाकीची मागणी वाढेल. त्यानंतर दिवाळी जवळ येईल त्याप्रमाणे कारची विक्री वाढण्याची शक्‍यता आहे.

सध्या करोना व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू या औद्योगिकदृष्ट्या सुधारलेल्या राज्यावर झालेला आहे. त्यामुळे या राज्यातून अजून फारशी विक्री वाढलेले नाही. मात्र, इतर राज्यांमध्ये विक्री वाढू लागली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बहुतांश कार आणि मोटरसायकल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना या परिस्थितीचा अंदाज आला होता. त्यांनी या संदर्भात सर्वेक्षणही केले होते. लोक आता सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे टाळतील. त्याऐवजी शक्‍य तितक्‍या जास्त प्रमाणात स्वतःचे वाहन बाळगण्याचा प्रयत्न करतील असे कंपन्यांना आढळून आले होते. त्यामुळे कंपन्यांनी ही त्या दृष्टिकोनातून उत्पादन वाढविण्याची तयारी केलेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.