मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या अभिनयापेक्षा इतर कारणांमुळेच जास्त चर्चेत असते. मग कधी ती सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करते तर कधी एखाद्या राजकारणी नेत्याशी पंगा घेते. केतकी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते.
गेल्यावर्षी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर केतकी चितळे तब्बल 41 दिवस तुरुंगात होती. तिने सोशल मीडियावर शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध केली होती आणि त्यामुळेच तिला तुरुंगवास भोगावा लागला होता.
आता याच तुरुंगवासाच्या प्रवासावर केतकी चितळेनं एक पुस्तक लिहिलं आहे. केतकीचं हे पुस्तक पुढच्या वर्षी प्रकाशित होणार आहे. याबाबतची माहिती तिनं स्वतः इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. नुकतंच केतकी आपल्या इंस्टाग्रामवर लाईव्ह आली होती. यावेळी बोलताना तिने या पुस्तकाबद्दल सांगितलं.
केतकी इन्स्टाग्रामवर लाईव्हवर बोलत होती. यावेळी तिनं एका चाहत्याला उत्तर देताना पुढच्या वर्षीय आपल्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित होणार असल्याचं सांगितलं. एका चाहत्यानं तिला विचारलं होतं की, “तुमची स्टोरी?’ यावर उत्तर देताना केतकी म्हणाली
की, “पुढच्या वर्षी माझं पुस्तक प्रकाशित होतंय. तर जरुर विकत घ्या. तुम्हाला माझं संपूर्ण आयुष्य नाही, पण तुरुंगात जायचा प्रवास आणि का? याच्या मागील कारण कळेल. कृपया, जेव्हा पुस्तक प्रकाशित होईल तेव्हा जरूर विकत घ्या…’ असं तिने यावेळी सांगितलं.